पणजी- विविध प्रकारच्या मत्स्य संपत्तीबाबत समृद्ध असलेल्या गोव्यात येत्या जानेवारीच्या अखेरच्या आठवडय़ात फिश फेस्टीव्हल होणार आहे. मच्छीमार खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली.अनेक प्रकारच्या माशांसाठी गोवा प्रदेश ओळखला जातो. येथील मत्स्य संस्कृती जगात प्रसिद्ध आहे. पर्यटकांनाही या संस्कृतीचे मोठे आकर्षण असते. गोव्यात एरव्ही फिश फेस्टीव्हल हा डिसेंबर महिन्यात होत असतो. त्यावेळी पर्यटकही मोठ्या संख्येने आलेले असतात. तथापि, मच्छीमार खात्याची अजून तयारी झालेली नाही. मंत्री पालयेकर म्हणाले, की आम्ही 7 डिसेंबरला फिश फेस्टीव्हल आयोजित करावा असे अगोदर ठरवले होते. तथापि, आता हा महोत्सव येत्या 27 जानेवारीला आयोजित करू. डिसेंबरमध्ये विविध सोहळे होत असतात. जानेवारीमध्ये मोकळा वेळ मिळेल. 27 ते 30 जानेवारी या दिवसांत फिश फेस्टीव्हल आयोजित करण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करणार आहे. पणजीत बांदोडकर मैदानावर हा महोत्सव होईल.
मंत्री पालयेकर म्हणाले, की गोव्यात माशांचे उत्पादन वाढावे म्हणून विविध योजना राबविल्या जात आहेत. गोव्यातील मत्स्स्यसंपत्ती गोव्याबाहेर जास्त प्रमाणात जाऊ नये म्हणून उपाययोजना केली जाईल. त्यासाठी कायद्यातही दुरुस्ती केली जाणार आहे. गोव्याहून कर्नाटक आणि अन्य राज्यांमध्ये मासे निर्यात केले जातात. राज्याच्या तपास नाक्यांवर यासाठी शूल्क लागू केले जाईल. सध्या काहीच शूल्क नाही. गोव्यातील मासळी गोव्यातच राहिली तर, येथे तुटवडा जाणावरणार नाही. त्यामुळे मग मासे स्वस्त होतील. आम्ही गोमंतकीयांना अनुदानित दराने मासळी देऊ पाहत आहोत.
मंत्री पालयेकर म्हणाले, की केंद्र सरकारने एलईडी फिशिंग आणि बुल ट्रॉलिंग ह्या घातक मासेमारीपद्धतीविरुद्ध बंदी लागू केली आहे. या बंदीची गोव्यात प्रभावीपणो अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळेच बाजारपेठेत सध्या खूप मोठय़ा प्रमाणात मासे उपलब्ध असल्याचे दिसून येते. तथापि, राज्याच्या जेटींवर पोलिस ठेवावेत असाही विचार आम्ही करत आहोत. पारंपरिक मच्छीमारांचे आम्ही हित जपू. समुद्रात बंदीचे उल्लंघन करून किंवा अन्य बेकायदा पद्धतीने जे मासेमारी करतात त्यांच्याविरुद्ध कारवाई कडक केली जाईल. त्यासाठी शुल्काचे प्रमाण वाढविले जाईल. आम्ही अशा प्रकरणी 92 व्यक्तींना नोटीसा पाठविल्या आहेत. आणखी तीनशेजणांना नोटीसा पाठविल्या जातील.