पणजी : गोवा विधानसभेचे सभापती असलेले व भाजप पक्ष संघटनेत अनेक वर्षे काम केलेले डॉ. प्रमोद सावंत आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये येऊन आरोग्य मंत्री बनलेले विश्वजित राणे या दोन्ही नेत्यांचे गेल्या दहा वर्षांत कधीच पटले नाही. हे दोन्ही नेते मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार आहेत. मनोहर पर्रिकर यांनी जर मुख्यमंत्रीपद सोडले तर भाजपमधील या दोघांपैकी एकाची वर्णी मुख्यमंत्रीपदी लागेल अशी स्थिती आहे. मात्र, सध्या मासळी आयात बंदीच्या विषयावरून राणे व सावंत या दोन्ही नेत्यांमध्ये कांटे की टक्कर अनुभवास येत आहे.
मासळी ताजी ठेवण्यासाठी गोव्याबाहेरून येणाऱया माशांमध्ये फॉर्मेलिन नावाच्या घातक रसायनाचा वापर करतात अशा प्रकारचा आरोप झाल्यानंतर मंत्री राणे यांच्या अन्न व औषध प्रशासन खात्याने मासळीची वाहतूक आणि मासळीचा व्यापार यासाठी कडक अशा सूचना लागू केल्या. या सूचनांमुळे कर्नाटक, महाराष्ट्र व अन्य भागांतून गोव्यात मासळी येणे बंद झाले. तसेच गोव्याहून निर्यातीसाठी जाणारी मासळीही बंद झाली. यामुळे रोज लाखो रुपयांचे नुकसान मासळी व्यापाऱ्यांना होत आहे. गोव्याचा मत्स्स्य उद्योग अडचणीत आलेला आहे हा आमदार तथा सभापती सावंत यांचा मुद्दा आहे. हा मुद्दा योग्य आहे. पण मुख्यमंत्री पर्रिकर यांच्यासमोर सावंत यांनी हा मुद्दा मांडून तोडग्यासाठी तुम्ही हस्तक्षेप करावा अशी विनंती केली हे मंत्री राणे यांना आवडले नाही. मंत्री राणे यांनी लगेच आपली प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिली. सभापती सावंत यांनी मांडलेले मत हे त्यांचे व्यक्तीगत स्वरुपाचे असून आपल्यावर ते बंधनकारक नाही, आपण टप्प्याटप्प्याने योग्य ती पाऊले उचलीन, असे मंत्री राणो यांनी जाहीर केले.
सावंत यांचा साखळी मतदारसंघ आणि मंत्री राणो यांचा वाळपई मतदारसंघ यांच्यात जास्त अंतर नाही. राणे जेव्हा काँग्रेस पक्षात होते तेव्हा सावंत हे सत्तरी तालुक्यात जाऊन भाजपचे काम करतात हे मंत्री राणे यांना आवडत नसे. राणे हे विरोधी बाकांवर होते तेव्हापासून आमदार सावंत यांच्याशी त्यांचा संघर्ष सुरू आहे. आता दोघेही एकाच पक्षात असले तरी, त्यांचे मनोमिलन झालेले नाही याची कल्पना भाजप पक्ष संघटनेलाही आहे. मंत्री राणे हे मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावे म्हणून लॉबिंग करत आहेत. सभापती सावंत यांनी मुख्यमंत्री पर्रिकर यांच्याशी आपले चांगले संबंध वाढविले आहेत. राणे व सावंत यांची मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा आहे व त्या स्पर्धेतूनच दोघांमधील संघर्ष वाढतोय याची कल्पना भाजपच्या कोअर टीमलाही आलेली आहे. राणे यांनी मासळीप्रश्नी आक्रमकपणे सावंत यांना अप्रत्यक्षरित्या उत्तर द्यायला नको होते, अशी चर्चा अन्य मंत्र्यांमध्ये सुरू आहे. फॉर्मेलिन माशांचा घोळ हा सरकारी पातळीवरूनच अगोदर सुरू झाला व आता त्यावर तोडगा काढताना सरकारच्या हाताला काटे टोचत आहेत याची कल्पना विरोधी काँग्रेसलाही आली आहे.