काशिराम म्हांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: म्हापसा येथील प्रसिद्ध अशा मासळी मार्केटमधील महिला वक्रिेत्या तसेच आरटीआय कार्यकर्त्यामधील वादावर अखेर पडदा पडला. बार्देश तालुक्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांनी या वादावर सुनावणी घेऊन वाद सामंजस्याने सोडवला. महिला मासळी विक्रेत्या तसेच आरटीआय कार्यकर्त्यात मध्यंतरी वाद निर्माण झालेला.
पालिकेने स्थापन केलेल्या फिरत्या विक्रेत्यांच्या समिती मार्फत ओळखपत्रे बनवून देतो असे सांगून पैसे उकळल्याचा आरोप विक्रेत्यांकडून केला होता. त्यातून वाद निर्माण होऊन प्रकरण पोलिसात गेले होते. हे प्रकरण पोलिसांत पोहचल्यानंतर परस्पर तक्रारी दाखल करण्यात आलेल्या. या संदर्भात पोलिसांनी चँप्टर केस बनवून याचा अहवाल बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठवला होता. त्यानंतर दोन्ही पक्षांना समन्स पाठवून सुनावणीस हजर राहण्यास सांगितले होते. समन्स आल्यामुळे वक्रिेत्यांनी रोष व्यक्त करून आज बुधवारी मासळी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मार्केट बंद करून विक्रेत्या सुनावणीसाठी गेल्या होत्या. विक्रेत्या समितीच्या अध्यक्षा शशिकला गोवेकर यांनी प्रकरणावर तोडगा काढून उपजिल्हाधिकाऱ्याकडून ते मिटवण्यात आल्याची माहिती दिली.