पणजी : शेजारील राज्यांतील मासळी आवक बुधवारीही बंद राहिल्याने राज्यातील मासळी बाजारांत मत्स्यदुष्काळ दिसून आला. स्थानिक ट्रॉलरवाल्यांच्या समर्थनार्थ म्हापशात मच्छीमारांनी मासळी बाजार बंद ठेवला. अल्प आवक झाल्यामुळे मासळीचे दर गगनाला भिडले आणि याचा फटका मत्स्यखवय्यांना बसला. दरम्यान, या प्रकरणात सरकारने लक्ष घातल्याने गुरुवारपासून स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.पणजीतील मासळी बाजारात बुधवारी मोठी मासळी उपलब्ध नव्हती. लेपो, तारल्या आदी छोट्या मासळीचा तसेच लहान कोळंबीचा वाटाही १00 रुपये होता. दुपारनंतर मासेविक्रेत्या महिलांची संख्याही रोडावली. ट्रॉलरांची मासळी काही प्रमाणात आली; परंतु ती अपुरी पडली. मिरामार, करंझाळे भागातून रापणकारांची मासळी बाजारात आली; परंतु गिऱ्हाईकांची गर्दी झाल्याने ती लगेच संपली. अंतर्गत भागांमध्ये नद्यांमध्ये पकडल्या जाणाऱ्या गावठी मासळीलाही मोठा दर होता. हॉटेल, रेस्टॉरंट्सना दुसऱ्या दिवशीही मासळी मिळू शकली नसल्याने खवय्यांची निराशा झाली. (प्रतिनिधी)
मत्स्यदुष्काळ!
By admin | Published: May 14, 2015 1:38 AM