फोंडा : मद्यविक्री व्यवसायाचा मासळी व्यवसायाशी थेट संबंध येतो. तळीराम मद्यसेवनाबरोबरच रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या मासळीवरही ताव मारतात. त्यामुळे साहजिकच मासळी व्यावसायिकांना बार अॅण्ड रेस्टॉरंट हा महत्त्वाचा घटक असतो; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जी ४४0 मद्यविक्री आस्थापने बंद करण्यास भाग पाडले आहे, त्यामध्ये निम्म्याहून अधिक बार, रेस्टॉरंट या घटकांचा समावेश आहे. अशा व्यावसायिकांनी मासळी मार्केटमध्ये शनिवारी पाय ठेवला नाही. साहजिकच मासळी विक्रेत्यांना त्याचा फटका बसला. या व्यावसायिकांकडून दिवसा लाखो रुपयांची मासळी खरेदी केली जाते; परंतु आजच्या दिवशी केवळ काही हजारांचीच उलाढाल झाली. उल्हास नाईक या मासळी विके्र त्याने याबाबत बोलताना सांगितले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे बार अॅण्ड रेस्टॉरंट मालकांनी आमच्याकडून जी खरेदी व्हायची ती केली नाही, त्यामुळे बराच माल पडून राहिला. फोंडा शहरातील काही बड्या हॉटेलांनाही या आदेशाचा फटका बसला आहे. मासळी आहे; परंतु मद्यविक्री करणे शक्य नसल्याने ग्राहकांनी त्यांच्याकडे पाठ फिरविली. काही नामांकित हॉटेलांनी चांगले फॅमिली रेस्टॉरंट म्हणून नाव कमावले आहे अशांना त्याचा मोठा फटका बसल्याचे दिसून आले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारपासून फोंडा तालुक्यातील ४४0 मद्यविक्रेत्यांची आस्थापने बंद करण्यात आली आहेत. मुख्यमंत्र्यांना याबद्दल जाब विचारावा, अशा प्रतिक्रिया बऱ्याच व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.फोंडा तालुक्यातील एकूण ४४0 मद्यविक्री आस्थापनांना सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाची झळ बसली आहे. (प्रतिनिधी)
मासळी विक्रेत्यांनाही बसला मोठा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2017 2:25 AM