ऑनलाइन लोकमतपणजी, दि. २८ - आॅक्टोबरमध्ये राज्यात होऊ घातलेली ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका राष्ट्रांची ब्रीक्स परिषद उधळून लावण्याचा इशारा मच्छिमार संघटनेने दिला आहे. बेतुल येथील नियोजित उपग्रह बंदर मोडीत न काढल्यास तसेच मच्छिमारांच्या पारंपरिक घरांवर कारवाईचा निर्णय मागे न घेतल्यास हे पाऊल उचलावे लागेल, असे संघटनेचे सरचिटणीस ओलेन्सियो सिमोइश यांनी म्हटले आहे. बेतुल येथे उपग्रह बंदर झाल्यास तेथील मच्छिमारांना त्याचा जबर फटका बसणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. उदरनिर्वाहाचे साधनही नष्ट होईल तसेच विस्थापित व्हावे लागेल ही भीती मच्छिमारांमध्ये आहे. सरकार पारंपरिक मच्छिमारांना गृहित धरुन असे प्रकल्प लादत असल्याचा आरोप सिमोइश यांनी केला. बेतुलमध्ये मच्छिमारांची काही बांधकामे सीआरझेड नियमांचे उल्लंघन करुन केल्या प्रकरणी कारवाईच्या सावटाखाली आहेत. गोव्यात १५ व १६ आॅक्टोबर असे दोन दिवस मुख्य ब्रीक्स परिषद होत असून पाचही राष्ट्रांचे ८ हजारांहून अधिक अतिमहनीय प्रतिनिधी उपस्थिती लावणार आहेत. १९८२ साली राज्यात झालेल्या चोगम परिषदेनंतर गोव्यातील हा सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय इव्हेंट ठरणार आहे.
गोव्यातील ब्रीक्स परिषद उधळण्याचा मच्छिमारांचा इशारा
By admin | Published: June 28, 2016 7:25 PM