पणजी : गोव्यात आजपासून मासेमारीबंदी सुरु होत असून ३१ जुलैपर्यंत ४७ दिवस मच्छिमारी बंद राहणार आहे. ट्रालर्सना समुद्रात जाण्यास मनाई असून बंदी मोडून मासेमारीसाठी गेल्यास कारवाई केली जाईल.
राज्यात एरव्ही मासेमारी बंदी १ जूनपासून ३१ जुलैपर्यंत ६१ दिवस असते. परंतु यंदा केंद्र सरकारने लाकडाउनच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांचे उत्पन्न बुडाल्याने मच्छिमारांना दिलासा देत मासेमारीबंदीच्या बाबतीत १५ दिवसांची शिथिलता दिली. गोवा सरकारनेही ही शिथिलता लागू केल्याने मच्छिमारांना दिलासा मिळाला होता परंतु तो क्षणभंगूर ठरला. या महिन्याच्या सुरवातीपासूनच समुद्र खवळलेला होता आणि हवामान खराब झाल्याने ट्रॉलर्सना जेटींवरच नांगर टाकावा लागला.
मालिम जेटी राज्यातील सर्वात मोठी जेटी असून सुमारे ३00 ट्रॉलर्स या जेटीवर आहेत. याशिवाय कुटबण, बेतुल, वास्को, शापोरा येथेही ट्रॉलर्स आहेत. यामुळे राज्यातील एकूण मच्छिमारी ट्रॉलर्सची संख्या सुमारे १२00 आहे.
गोव्याहून केरळ, मंगळुरु, रत्नागिरीला मासळी निर्यात केली जाते. तसेच काही ठराविक मासळी विदेशातही निर्यात केली जात.
दरम्यान, मालिम फिशरमेन्स को आॅपरेटिव्ह सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा ट्रॉलरमालक सीताकांत परब म्हणाले की, यंदा मच्छिमारांसाठी अत्यंत कठीण काळ गेला. ओडिशा, झारखंडचे खलाश्ी लॉकडाऊनच्या काळात गांवी परतले तसेच मासळी बाजारही बंद राहिल्याने मासेमारी होऊ शकली नाही.