म्हापसा : गांजाची लागवड करुन त्याचे पीक गोव्यात घेणे हा गोमंतकीयांसाठी नवीन प्रकार नाही. उत्तर गोव्यात आजपर्यंत अशा प्रकारची पाच प्रकरणे उघडीस आली आहेत. मागील दोन वर्षात तर लागवडीचे चार प्रकार समोर आले असून केलेली लागवड ही पद्धतशीर नियोजित पद्धतीने केल्याचे आढळून आले आहे. उघडकीस आलेले बहुतेक प्रकार हे किनारी भागातील असून स्थानिकांसोबत त्यात काही परदेशी नागरिक सुद्धा अडकल्याचे केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. मागील आठवड्यात क्राईम ब्रॅचने पर्वरीजवळ असलेल्या पिळर्ण भागातील एका बंगल्यात होत असलेल्या लागवडीवर कारवाई करुन सुमारे ३.५० लाख रुपयांची गांजाची शेती नष्ट केली होती. गेल्या वर्षी जुलै महिन्यात क्राईम ब्रॅचने शिवोली भागात केलेल्या कारवाई दोन रशियन नागरिकांना अटक केली होती. लागवड केलेली १० लाख रुपया किमतीचा गांजा नष्ट करण्यात आलेला. या नागरिकांकडून पद्धतशीरपणे भाड्याने घेतलेल्या बंगल्यावर लागवड केली होती. कोणालाही संशय येऊ नये यासाठी परिसराला एखाद्या प्रयोगशाळेचे स्वरुपही देण्यात आले होते. अशाच प्रकारची आणखी एक कारवाई शिवोली भागात या वर्षी जुलै महिन्यात करण्यात आलेली. त्यात रशियन नागरिक मॅक्सीम मोस्केचेव्ह व आर्टेम सेरेगिन यांना अटक करण्यात आली होती. एकूण ३० किलो गांजा पोलिसांना सापडला होता. त्याची किंमत सुमारे १० लाख रुपयांची होती. ते रहात असलेल्या भाड्याच्या घरात गुप्तपणे कुंडीत गांजाची लागवड केली होती. लागवडीसाठी अत्यंत शास्त्रोक्त तसेच व्यवसायिक पद्धत वापरण्यात आली होती. रोपांच्या लागवडीसाठी कृत्रिम रोषणाई सुद्धा वापरण्यात आली होती. त्यामुळे त्याने कसली लागवड केली आहे हे कळणे सुद्धा बरेच कठीण झाले होते. त्यापूर्वी कांदोळी परिसरात एका बंगल्याच्या परसात होत असलेल्या लागवडीवर कारवाई केली होती. त्यात एका स्थानिकासोबत काम करणाऱ्या दोन मजुरांना ताब्यात घेण्यात आले होते. सदर बंगल्यात वापरण्यात आलेले काही हुक्केसुद्धा ताब्यात घेतले होते. बऱ्याच वर्षापूर्वी पेडणे तालुक्यात असाच एक प्रकार घडला होता. या तालुक्यातील एका वयस्कर नागरिकांनी स्वत:च्या जागेत गांजाची लागवड केली होती. नंतर हा प्रकार अमली पदार्थ विरोधी पथकाने उघडकीस आणला होता. गांजाची लागवड गोव्यात अल्प प्रमाणावर केली जाते. कर्नाटक, केरळ, हिमाचल प्रदेश तसेच महाराष्ट्रात त्याची लागवड आढळून आली आहे. गोव्यात येणारा गांजा हा जास्त प्रमाणावर याच भागातून येत असतो. होत असलेली लागवड जास्त प्रमाणात किनारपट्टी भागात होत असल्याने येणाऱ्या पर्यटकांना केंद्रस्थानी ठेवून ही लागवड केली जाते. त्याची विक्री किंवा वापर सुद्धा नियोजित पद्धतीने केला जातो. काही विक्रेते हॉटेल व्यवसायिकांना जवळ धरुन त्याची विक्री करतात तर काही व्यवसायिक पार्ट्यांना लक्ष करुन त्याची विक्री करतात. लागवडीसाठी लागणाºया बिया बहुतेकवेळा शेजारील राज्यातून आणल्या जातात. गांजा पेरल्यानंतर उगविण्यास किमान दीड महिन्याचा कालावधी लागत असतो. त्यामुळे लागवड होईपर्यंत कसल्या प्रकारची लागवड केली जाते याची माहिती मिळणे बरेच कठीण होत असते. त्यामुळे कारवाई करताना अत्यंत सावधगिरी बाळगून नंतर कारवाई करावी लागते अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
उत्तर गोव्यात गांजा लागवडीची पाच प्रकरणं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 3:04 PM