ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 6- ओशेल-शिवोली येथे मानवी आरोग्यास घातक रसायनांचा वापर करून कृत्रिमरीत्या पिकविले जाणारे सुमारे चार टन आंबे छापा टाकून जप्त केले. त्यांची किंमत अंदाजे पाच लाख रुपये होती. जप्तीनंतर सर्व आंबे म्हापसा येथे पठारावर नष्ट करण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही कारवाई केली. ओशेल-शिवोली येथील सुशांत बाणावलीकर यांच्या घरात ही कारवाई केली. इथोफेन व इथेरियल ही रसायने वापरून हे आंबे कृत्रिमरीत्या पिकविले जात होते. या रसायनांच्या बाटल्याही घराच्या मागील बाजूस जप्त केल्या. प्लास्टिक बादल्या, टब आदी साहित्य तसेच रसायनाच्या बाटल्या, ट्युब्सही घटनास्थळी सापडल्या.एफडीएचे विशेष फथक या कारवाईसाठी गेले होते, अशी माहिती खात्याचे संचालक सलीम वेलजी यांनी दिली. आंब्यांचे नमुने घेतले आणि त्यांची तपासणी बांबोळी येथील प्रयोगशाळेत केली. तीत रसायनांचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले. बाणावलीकरनेही रसायने वापरल्याची कबुली दिली. काही तास उलटल्यानंतर रसायन वापर शोधून काढणे कठीण बनते, त्यामुळे शक्य तितक्या लवक र प्रयोगशाळेत तपासणी करून रसायनांचा वापर शोधून काढावा लागतो. (प्रतिनिधी) पंधरा दिवस पाळत एफडीएचे अधिकारी पंधरा दिवस पाळत ठेवून होते. मडगाव येथे गांधी मार्केट, मालभाट, झरीवाडो तसेच अपोलो इस्पितळ परिसरातही असेच प्रकार चालत असल्याचा संशय आहे. परंतु तेथे रंगेहाथ पकडण्यात अधिकाऱ्यांना अजून यश आलेले नाही. शिवोली प्रकरणाच्या बाबतीत २९ एप्रिल रोजीही घराच्या मागील बाजूस रसायनाच्या वापरलेल्या रिकाम्या बाटल्या फेकल्याचे आढळून आले होते; परंतु त्या वेळी बाणावलीकर हा रंगेहाथ सापडू शकला नव्हता.