पणजी : सत्तरी तालुक्यात येणाऱ्या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण पाच नवी पंचायत घरे बांधली जाणार आहेत. त्याबाबतची निविदा प्रक्रियाही सुरू झाली आहे. तसेच सत्तरी तालुक्यासाठी वाळपईत स्वतंत्र उपजिल्हाधिकारी कार्यालयाची व्यवस्था करण्याची मागणीही सरकारने मान्य केली आहे.
गुळेली, म्हाऊस, केरी, उसगाव अशा काही पंचायतींना नवी पंचायत घरे बांधून दिली जाणार आहेत. गोवा साधनसुविधा विकास महामंडळाने (जीएसआयडीसी) त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण पंधरा कोटी रुपयांचा खर्च पाच पंचायत घरांच्या बांधकामावर येईल. आरोग्यमंत्री तथा वाळपईचे आमदार विश्वजित राणे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
सत्तरी तालुक्यासाठी स्वतंत्र उपजिल्हाधिकारी कार्यालय असावे अशी मागणी होती. कारण सत्तरीतील लोकांना डिचोलीला वगैरे जावे लागत होते. स्वतंत्र उपजिल्हाधिकारी कार्यालयाची मागणी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व महसूल मंत्री रोहन खंवटे यांनी मान्य केल्याचे मंत्री राणे यांनी जाहीर केले. उद्या 19 रोजी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार आहे. वाळपईत आज सायंकाळी साडेचार वाजता सिंगल स्क्रीन मल्टीप्लेक्सचे उद्घाटन केले जाणार आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे मल्टीप्लेक्स साकारले. प्रतापसिंग राणे हे मल्टीप्लेक्सचे उद्घाटन करतील, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी जाहीर केले.
दरम्यान, केरी येथे आधुनिक पद्धतीची रुग्णवाहिका मंगळवारपासून सुरू करण्यात आली. जीव्हीके ईएमआरआय सेवेंतर्गत ही रुग्णवाहिका देण्यात आली आहे. तसेच ठाणे-सत्तरी येथे एमजर्न्सी केअर सेंटर मंगळवारी सुरू करण्यात आले. सत्तरीतील ग्रामीण भागात अधिकाधिक आरोग्य सुविधा पोहचविण्याचा आपला संकल्प आहे, असे मंत्री राणे म्हणाले.