पणजी - गोव्यातील कळंगुट बीचवर पाच जण बुडाले आहेत. यामधील तिघांचे मृतदेह मिळाले असून दोघांचा शोध सुरु आहे. बुडालेले पाच जण अकोला जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये दोन भावांचा समावेश आहे. त्यापैकी एक जण पोलिस शिपाई आहे. प्रीतेश लंकेश्वरनंदा गवळी (वय 32 वर्ष, पोलिस शिपाई), चेतन लंकेश्वरनंदा गवळी (वय 27 वर्ष, विद्यार्थी), उज्ज्वल प्रकाश वाकोडे (वय 25 वर्ष, मेकॅनिक) अशी मृतांची नावं आहेत.
मोठी उमरी, विठठ्ल नगर अकोला येथील 14 जणांचा ग्रुप गोव्यामध्ये रेल्वेने आज सकाळी साडे-चार वाजता आला होता. सकाळी मडगाव रेल्वे स्टेशनवरुन ते टॅक्सीने कळंगुट बीचवर पोहचले. कळंगुट बीचवर पोहोचताच सगळे 14 जण समुद्रात उतरले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने पाच जण आत ओढले गेले. तर उर्वरित नऊ जण सुखरुप किनाऱ्यावर पोहोचले. जवळपास 20 मिनिटांनी तिघांचे मृतदेह समुद्रकिनाऱ्यावर सापडले.किरण ओमप्रकाश म्हस्के आणि शुभम गजानन वैद्य हे दोघे बेपत्ता आहेत. लाईफ गार्ड्सच्या मदतीने पोलिस समुद्रात या दोघांचा शोध घेत आहेत.