मडगाव: बेतूल येथील क्लीन्ट रिबेलो या तरुणाला मारहाण करण्याचा आरोप असलेले कुंकळ्ळी पोलीस स्थानकाच्या पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश वेळीप आणि पोलीस शिपाई उपेंद्र उपसकर, संदीप कोंकरे, जितेश गावकर व पोलीस वाहनाचा ड्रायव्हर चंद्रू गावकर यांचा निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये समावेश आहे. सहाय्यक पोलीस महानिरीक्षक परमादित्य यांनी बुधवारी दुपारी हा आदेश जारी केला.
बेतूल येथील तरुणाला सदर पोलिसांकडून चामड्याच्या पट्ट्यांनी मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी त्यांना निलंबित करण्याची शिफारस प्राथमिक चौकशीनंतर करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी दोषी असलेल्या पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी गोवा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी केली आहे. दरम्यान, या निलंबित पोलिसांनी आपल्या निलंबनाच्या काळात दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयात हजेरी द्यावी असे या आदेशात म्हटले आहे.
पोलीस मुख्यालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, मडगावचे पोलीस उपअधीक्षक राजू राऊत देसाई यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत पोलीस उपनिरीक्षक व इतर पोलीस दोषी असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने ही निलंबनाची शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान, कुठल्याही पोलिसांनी केलेली बेशिस्त वर्तवणूक खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा गोव्याचे पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी दिला आहे.
मडगावपासून 15 कि.मी. अंतरावर असलेल्या असोळणा या गावात ही मारहाणीची घटना रविवारी सायंकाळी झाली होती. एका अपघात प्रकरणात या रस्त्यावरील वाहने पोलिसांनी अडवून धरल्यानंतर क्लीन्ट रिबेलो आणि उपनिरीक्षक वेळीप यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. आपण पोलिसांना वेडे म्हटले म्हणून आपल्याला पोलिसांनी मारहाण केली असा जरी दावा क्लीन्ट याने केला असला तरी क्लीन्टने पोलिसांना शिवीगाळ करत उपनिरीक्षकाची कॉलर पकडल्यामुळेच रागाचा पारा चढलेल्या पोलिसांकडून त्याला मारहाण करण्यात आली असेही या चौकशीत पुढे आले आहे.
असे जरी असले तरी वरिष्ठ पोलीस अधिका:यांनी हे प्रकरण बऱ्याच गांभीर्याने घेतल्याचे दिसून आले. अशी प्रकरणे कशी हाताळावीत याचे पुरेसे प्रशिक्षण नसल्यामुळेच अशा घटना घडतात अशी प्रतिक्रिया खुद्द पोलीस महासंचालक चंदर यांनी दिली. यापूर्वीही आयआरबीच्या उपनिरीक्षकाकडून लेस्टर डिसोझा या युवकाला अशीच मारहाण झाली होती. त्यानंतर लगेच ही घटना घडल्याने पोलिसांवर टीकेचा भडिमार होत आहे.
बुधवारी महिला काँग्रेसच्या गोवा प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी बेतूल येथे जाऊन क्लिन्ट याची भेट घेतली. त्यानंतर त्याच्याबरोबर महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कुंकळ्ळी पोलीस स्थानकावरही हजर झाल्या. यावेळी दोषी पोलिसांनी क्लीन्टची माफी मागण्याचा प्रयत्न केला असे कुतिन्हो यांनी सांगितले. मात्र पोलिसांची कृती माफी देण्यासारखी नसून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.