लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यात फिल्म सिटी उभी राहिल्यास पहिल्या ५ वर्षात ५ हजार नोकऱ्या तयार होणार असल्याची माहिती समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली आहे.
काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांनी या प्रकल्पामुळे २० हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे म्हटले होते. लोलये येथील भगवती पठारावर फिल्म सिटी प्रकल्प येत असल्याची चर्चा आहे. फिल्म सिटीच्या बाबतीत फळदेसाई म्हणाले की, फिल्म सिटीमुळे पहिल्या ५ वर्षांत ५ हजार नोकऱ्या तयार होतील. याशिवाय इतर स्वरूपाचे रोजगारही निर्माण होणार आहेत. त्यामुळे फिल्म सिटी गोव्याच्या फायद्याची आहे, असे ते म्हणाले.
गोवा ही कलाकारांची भूमी असल्यामुळे आणि गोव्यात सर्जनशीलतेची तसेच प्रतिभेची कमी नसल्यामुळे फिल्म सिटी गोव्यात होणे हे गोमंतकीयांच्याच फायद्याचे आहे. कलाकारांना यामुळे वाव मिळणार आहे. अपुऱ्या साधन सुविधांमुळे काहीजण कलेचे क्षेत्रच सोडून जातात. त्यामुळे साधन सुविधांनी युक्त अशी फिल्म सिटी गोमंतकीय कलाकारांचेही हित साधेल, असे ते म्हणाले. फिल्म सिटीमुळे गोव्यातील कलाकारांना चांगले व्यासपीठ मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काणकोण येथून फिल्म सिटीसाठी प्रस्ताव आल्याचे त्यांनी सांगितले. फिल्मसिटीसाठी प्रस्ताव स्वीकारणे चालू आहे. अजूनही प्रस्ताव पाठवू शकतात असे ते म्हणतात.