ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 31- पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा नारा आपण सगळेच देत आहोत. त्यासाठी प्लॅस्टिकचा वापर कमी करावा, रस्स्त्यावर प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या, ग्लास फेकू नका असंही ओरडून सांगितलं जातं आहे. पण आजसुद्धा प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर केला जातो आहे. पण या परिस्थितीला गोवा अपवाद ठरणार, अशी चिन्ह आता दिसायला लागली आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी प्लॅस्टिकच्या वापराला आळा घालण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पर्रिकर सरकारने जुलै महिन्यापासून प्लॅस्टिक बनवण्यावर, बाळगण्यावर आणि विकण्यावर बंदी आणली आहे. तसंच प्लॅस्टिकचा वापर करताना पकडलं गेल्यास पाच हजार रूपये दंड आकारण्याचा निर्णय मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी घेतला आहे.
प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयावर लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती मनोहर पर्रिकर यांनी दिली आहे. राज्यात प्लॅस्टिकचा वापर करताना आणि सार्वजनिक ठिकाणी प्लॅस्टिकचा कचरा करणाऱ्यांना दहा हजार रूपये दंड भरावा लागेल. असंही मनोहर पर्रिकर यांनी जाहीर केलं आहे. लोक जर बेजबाबदार वागली तर सरकारला कामं करणं शक्य होणर नाही, असंही पर्रिकर यांनी नमुद केलं आहे.
गोवा सरकारने महामार्ग कचरा मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले होते पण हायवेवरचा कचरा एकदा उचलून नेल्यावर तिथे पुन्हा कचरा केला जायचा असं निरिक्षण नोंदवलं गेलं होतं. ती परिस्थिती टाळण्यासाठी आता महामार्गांवरचा कचरा उचलण्यासाठी कार्य केंद्र चालू करण्यात आली आहेत. तसंच कचरा रस्त्यावर न फेकता कार्य केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना द्यावा, असं आवाहन लोकांना केल्याची माहिती मनोहर पर्रिकर यांनी दिली आहे.
सध्या गोवा बायोडिग्रेडेबल गार्बेज अॅक्ट 1996 नुसार तिथे 40 मायक्रॉनच्या खाली प्लॅस्टिक वापरावर बंदी आहे. तसंच गोव्यातून दुकानदारांनासुद्धा प्लॅस्टिक बॅग विकण्यासाठी प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनाअंतर्गत नोंदणी करायला सांगितली होती.