मडगाव : गोव्याबाहेरुन येणा-या पर्यटकांसाठी मागचा काही काळ कर्दनकाळ ठरलेल्या उत्तर गोव्यातील बागा ते कांदोळी या पट्ट्यात मागच्या 24 तासात बुडणा-या 5 पर्यटकांचा जीव जीवरक्षकांनी वाचविला असून या पार्श्वभूमीवर पोहण्यासाठी ज्या जागा घोषित करण्यात आल्या आहेत तेथेच पोहा. निर्बधित क्षेत्रात जाऊ नका, असा इशारा दृष्टी मरिन्स या जीवरक्षक सेवा देणा-या संस्थेने दिला आहे. यातील चार पर्यटकांना बागा येथे तर एका पर्यटकाला कांदोळी येथे बुडताना वाचविण्यात आले. या दोन्ही घटना सोमवारी दुपारी 4 वाजेनंतर घडल्या असून दर्याच्या लाटांचा अंदाज न आल्यामुळे हे पर्यटक पाण्यात ओढले गेले असे सांगण्यात आले आहे.
यातील एक घटना दुपारी 4.30 वाजता बागा समुद्र किना-यावर घडली. मुंबईतील पर्यटकांचा एक गट दुपारी पोहण्यासाठी पाण्यात शिरला असता, त्यापैकी तिघेजण पाण्यात ओढले गेले. यावेळी किना-यावर असलेल्या आनंद व केतन या जीवरक्षकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पाण्यात उड्या टाकून या पर्यटकांना किना-यावर आणले. हे पर्यटक पोहण्यासाठी र्निबधित असलेल्या जागेत किना-यापासून दहा ते पंधरा मीटर दूर पाण्यात उतरले होते. त्या क्षेत्रात पोहू नका असा जीवरक्षकांनी इशारा देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.
या घटनेच्या काही मिनिटांपूर्वीच बागा येथे अशाचप्रकारे आणखी एका बुडणा-या पर्यटकाला महेश व आनंद या दोन जीवरक्षकांनी किना-यावर आणले. त्याच दिवशी बागापासून काही अंतरावर असलेल्या कांदोळी समुद्र किना-यावर दुपारी 4.10 वाजता 20 ते 25 पर्यटकांचा एक गट र्निबधित क्षेत्रत पोहण्यासाठी उतरला असता एक पर्यटक लाटेच्या जोरावर समुद्रात खेचला गेला. पर्यटकांनी आरडा-ओरडा सुरु केल्यानंतर विनोद या जीवरक्षकाने त्याला पाण्याबाहेर काढले.
या पार्श्वभूमीवर दृष्टीचे वरिष्ठ सरव्यवस्थापक पी. एन. पांडे यांनी पर्यटकांनी पाण्यात उतरताना जीव रक्षकांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे अशी सुचना केली आहे. कित्येकवेळा दर्या खवळलेला असल्याने पाण्याच्या आतून येणा-या लाटा समजू शकत नाहीत. अशावेळी पर्यटकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे पोहण्यासाठी ज्या जागा निर्देशित केल्या आहेत त्या जागेतच पोहावे, असे आवाहन त्यांनी केले.