लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात सलग तिसऱ्या दिवशी, सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली. नद्यांना पूर येऊन लोकांच्या घरात पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले. ठिकठिकाणी रस्ते खचले तर पुराने नद्यांवरील साकव, पुलांचे कठडे वाहून केले. काही ठिकाणी दरडी कोसळल्या. सोमवारी दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने पुराचे पाणी ओसरले.
दरम्यान, नेवरा पंचायतीजवळ एका घराची भिंत कोसळून आई आणि मुलगा ठार झाल्याची घटना घडली. त्यामुळे गेल्या ४८ तासांत पावसाचे पाच बळी झाले आहेत.
राज्यात मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या तसेच पडझडीच्या घटना घडल्याने राज्य अग्निशमन दल सलग तीन दिवस त्यात गुंतून राहिले. रविवार आणि सोमवारच्या २४ तासांत सुमारे २५० कॉल अग्निशामक दलाकडे आले. नद्यांना पूर येऊन जोरदार पावसात झाडे, घरांच्या भिंती कोसळल्या. विजेचे खांबही कोलमडले.
महामार्गाजवळ महाखाजन-धारगळ येथे दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू राहिली. तर गिरी येथे पाणी साठल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. पावसाने केपे, सांगे, काणकोण परिसरातही थैमान घातले. उत्तर गोव्यात डिचोली तालुक्याला पावसाचा मोठा फटका बसला आहे.
हवामान खात्याने रविवारी आणि सोमवारी रेड अलर्ट दिल्याने सरकारने सोमवारी, इयत्ता बारावीपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. सोमवारीही ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. नद्याही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेती, बागायतीत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
पाजेंतार-कुठ्ठाळी येथे दरड कोसळून घराचे नुकसान
मुरगाव तालुक्यात सोमवारीसुद्धा दरड, झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. जेटी- बोगदा येथे सकाळी डोंगराळ भागातून दरड रस्त्यावर आल्याने नागरिकांचे नुकसान झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी दगड-माती हटवली. मांगोरहील-वास्को येथील श्रीकृष्ण मंदिरासमोरील झाड कोसळले. चिखली येथील इनडोअर क्रीडा संकुलाबाहेरील संरक्षक भिंत रस्त्यावर कोसळली. रविवारी पाजेंतार-कुठ्ठाळी येथे दरड कोसळल्याने तेथील रहिवासी सी. एन. पाटील यांच्या घराचे नुकसान झाले. चिखली येथे दरड कोसळून एका घराच्या कंपाउंडचे नुकसान झाले.
गावकरवाडा-उसगावमध्ये साकव कोसळला
वाळपई ते फोंडा मार्गावरील गावकरवाडा उसगाव येथील जुना साकव खचला आहे. सोमवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना घडली. या मार्गावरील वाहतूक कल्लभ उडीवाडामार्गे वळविण्यात आली आहे. तात्पुरत्या दुरुस्तीनंतर हा रस्ता वाहतुकीस खुला केला जाईल.
सासष्टीत मोठी पडझड
मुसळधार पावसामुळे सासष्टीत अनेक झाडांची पडझड झाली. कोंब येथे घरात पाणी शिरल्याने त्या कुटूंबाला शेजारी आश्रय घ्यावा लागला. आर्लेम येथे संरक्षक भिंतीवर झाड पडले. आरोशी- सखुभाट येथे झाड पडून वाहतुकीचा खोळंबा झाला.
९.२६ इंच २४ तासांत राज्यात पाऊस
गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल ९.२६ इंच पावसाची नोंद झाली. राज्यात आतापर्यंत ५८ इंच पाऊस झाला आहे. हवामान खात्याने आज, मंगळवारी रेड अलर्ट जारी केला आहे. तीन दिवसांतील पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे
पणजीत पावसाचा २५ वर्षांतील उच्चांक
पणजीत सोमवारी सकाळी ८:३० पर्यंतच्या २४ तासांत तब्बल १४.२ इंच इतका पाऊस नोंद झाला आहे. तर राज्यात सरासरी ९.२९ इंच पाऊस कोसळला. भारतीय हवामान खात्याच्या नोंदीनुसार हा जुलैमधील सर्वकालीन उच्चांक आहे. तर एकंदर पावसाळ्यात इतक्या विक्रमी प्रमाणात पाऊस पडण्याची ही दूसरी घटना आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार पणजीत जुलैमधील सर्वाधिक पावसाचा उच्चांक सोमवारी नोंद झाला.
सर्वत्र जोरदार बरसला
गेल्या २४ तासांत जुने गोवे केंद्रावर १३ इंच पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल म्हापसा केंद्रावर ११.६ इंच पाऊस झाला. आतापर्यंत सर्वांत जास्त पाऊस वाळपई केंद्रात नोंद झाला आहे. वाळपई एकूण ७१ इंच पाऊस झालेला आहे. तर सांगे केंद्रात ६८.४ इंच तर साखळीत ६५.५ इंच पावसाची नोंद झाली आहे.
फोंड्यात दरडी कोसळल्या
तालुक्यात सोमवारी दुपारनंतर पावसाने उसंत घेतली; मात्र खांडेपार नदीच्या पाण्याची पातळी तेवढीच राहिली. खाडेपार येथे पुरातन सप्तकोटेश्वर मंदिरात पाणी शिरले. पांडवकालीन गुहांमध्येसुद्धा कालपासून शिरलेले पाणी तसेच आहे. आमिगोस ते बेतोडापर्यंतच्या महामार्गावर तीन ठिकाणी दरडी कोसळल्या.