पणजी - माजी केंद्रीय संरक्षण मंत्री तथा माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी पंचवीस वर्षे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलेले राजधानी पणजी शहर सर्वार्थाने पुढारलेले असले तरी शहराच्या मळा भागात पावसाळ्यात येणारी पुराची समस्या काही कमी झालेली नाही. पर्रीकर यांच्या निधनानंतर नवे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या पुढाकाराने मळा पूरस्थितीवर नुकतीच जलस्रोतमंत्र्यांनी बैठक घेऊन उपाय योजनांबाबत आठ दिवसांच्या आत अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या बैठकीला महापौर उदय मडकईकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शहरातील मळा भागात दरवर्षी पावसाळ्यात पूर स्थिती उद्भवते. गेल्या पावसाळ्यात 25 घरांमध्ये पाणी शिरून मोठं नुकसान झालं. दरवर्षी पावसात रुअ द औरे खाडीचे पाणी मळा भागातील घरांमध्ये शिरते आणि सखल भागातील घरांमधील कुटुंबांच्या सामानाचे अतोनात नुकसान होते. सखल भाग असल्याने या घरांना धोका निर्माण झालेला आहे. सलग मुसळधार पाऊस झाला आणि भरती असली की मांडवी नदीचे पाणी रुअ द औरें खाडीमध्ये येते आणि मळा येथील घरांमध्ये शिरते. हा प्रकार दरवर्षी होतो. गेल्या पावसात सात ते आठ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले होते. स्थानिक आमदार व महापौर यांनी या कुटुंबांची येथील एका लॉजमध्ये व्यवस्था केली होती.
दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे महापालिका त्रस्त आहे. स्थानिक आमदार बाबूश मोन्सेरात यांनी याकामी पुढाकार घेतला असून जलस्रोतमंत्र्यांकडे मळ्यातील पुराच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या घरांचा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर मंत्र्यांनी वरील बैठक बोलावली. वन खात्याच्या अधिकाऱ्यांना पूरस्थिती टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. पुढील आठ दिवसात खर्चाचे अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे. इफ्फी संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे या गोष्टीचा पाठपुरावा केला जाईल, असे महापौर मडकईकर यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे ज्येष्ठ निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. बबन इंगोले यांनी मळा येथील पूर या विषयावर अभ्यास केला आहे. पाटो भागात काँक्रिटची जंगले उभी झाली असून याठिकाणी मोठ्या संख्येने खारफुटींचा संहार केला आहे. मळा येथे दरवर्षी येणाऱ्या पुराचे हेही एक प्रमुख कारण असल्याचे त्यांनी सांगितले. इंगोले म्हणाले की, पाटो भागात छोटे-छोटे नाले होते ते कॉंक्रिटीकरणामुळे बुजविले गेले व या ठिकाणी मोठ्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. पाण्याला वाट मिळत नाही आणि त्यामुळे पूर येतो. इंगोले यांच्या मते या घरांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना व्हायला हव्यात.