लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील श्री देवी लईराईच्या जत्रेनिमित्त राज्यातील हजारो धोंड व भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अस्नोडा ते शिरगाव हा रस्ता भाविकांनी खचाखच भरला होता. सकाळी धोंड भक्तांनी पवित्र तळ्यात स्नान करून देवीचे दर्शन घेतले. तसेच हजारो भाविकांनी होमकुंडाला लाकडाची मोठी अर्पण केली.
यावेळी मंदिरात पारंपरिक पद्धतीने धोंडांनी हातात बेत धरून नृत्य केले. मध्यरात्री अग्निदिव्य साकारले. विद्युत रोषणाई, कमानी उभारून सजावट करून सारा परिसर सजविण्यात आलेला आहे. देवस्थान समिती ही अनेक बाबतीत कार्यरत असून लाखो भाविकांची गर्दी होत असल्याने वाहतूक व पार्किंग सुविधा भाविकांना शिस्तीत दर्शन घेण्यासाठीची यंत्रणा कार्यरत होती. जत्रेनिमित्त पाच दिवस प्रसाधन व्यवस्था आदी केली आहे. भाविकांना सर्व ते सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष गणेश गावकर यांनी केले आहे.
दरम्यान, उपजिल्हाधिकारी रोहन कासकर, मामलेदार राजाराम परब आदी अधिकाऱ्यांनी शिरगावात येऊन आढावा घेतला. येथील प्राथमिक शाळेच्या मुलांनी कागदी पिशव्या तयार करून त्या जत्रेत वितरित करत प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्याचे काम केले आहे. तसेच लईराईच्या व्रतात लहान मुलांपासून अगदी ९० वर्षे वयोगटातील धोंड सहभागी होतात. अनेक युवती, महिला अग्निदिव्य साकारतात. ही जत्रा म्हणजे प्रत्येकाच्या जिवाभावाचा उत्सव असतो, त्यामुळे कौलोत्सवास मोठी गर्दी करतात.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"