लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रातून काही गाव वगळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. यासंबंधी केंद्राकडून आलेले परिपत्रक स्थानिक पंचायती तसेच संबंधित आमदारांना पाठवले आहे. त्याअनुषंगाने लेखी स्वरुपात हरकती व सूचना मागवल्या असल्याचे सावंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, '२० दिवसांचा कालावधी उलटला आहे. आणखी ४० दिवस बाकी आहेत. या मुदतीत हरकती, सूचना पाठवाव्यात, जेणेकरुन आम्ही पत्र लिहून केंद्राकडे काही गावे वगळण्याची मागणी करू. केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांकडे यासंबंधी सातत्याने पाठपुरावा चालू असल्याचे सावंत म्हणाले.
प्राप्त माहितीनुसार मसुदा अधिसूचनेत पश्चिम घाटात जे गाव पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अधिसूचित केलेले आहेत, त्यातील किमान ४० गावे वगळण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. सत्तरी व सांगे तालुक्यात असे गाव जास्त प्रमाणात आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या आपल्या दिल्ली भेटीबद्दल माहिती देताना दाबोळी विमानतळ चालूच रहावा यासाठी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांना घातलेले साकडे याविषयी सांगितले. याचबरोबर 'आयकांव'ची एक बैठक पुढील महिन्यात गोव्यात होणार असल्याचे ते म्हणाले.