फोंडा - गोमंतकीय माणूस हा क्रीडाप्रेमी म्हणून अख्या जगात प्रसिद्ध आहे. खेळाप्रती आमची आवड लक्षात घेऊनच आम्हाला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. यापूर्वी सुद्धा आम्ही राष्ट्रीय स्तरावरील काही क्रीडा स्पर्धा आयोजित करून, आमचे व्यवस्थापन कौशल्य दाखवलेले आहे. आता सुद्धा प्रत्येक गोमंतकीय नागरिकांनी व क्रीडाप्रेमीनीं सदर स्पर्धेला सहकार्य करून, गोव्याचे नाव उंचावण्यास मदत करावी. असे आवाहन कृषी मंत्री रवी नाईक यांनी केले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा च्या पार्श्वभूमीवर फोंड्यात क्रीडा ज्योतीचे स्वागत केल्यानंतर ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष रितेश नाईक, उपनगराध्यक्ष दीपा कोलवेकर, वेलिंगचे उपसरपंच रुपेश नाईक, विपीके चे अध्यक्ष दुर्गादास गावडे, भाजप मंडळ अध्यक्ष व नगरसेवक विश्वनाथ दळवी , आनंद नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की सदरची स्पर्धा गोव्यामध्ये आयोजित करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले असून, त्यांनी केलेली मेहनत सार्थ ठरवण्याची जबाबदारी आता आमच्यावर आलेली आहे. राष्ट्रीय स्तरावरील चार स्पर्धा फोंड्यात सुद्धा होत असून, त्या संदर्भाची संपूर्ण तयारी आमच्या प्रशासनाने केली आहे. खेळाडूंच्या स्वागतासाठी फोंडा सज्ज झाला आहे.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष रितेश नाईक म्हणाले की आम्ही सर्वजण एक आहोत हे दाखवण्याची संधी आम्हाला क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मिळालेली आहे. आम्ही सगळे एक होउन सदरची स्पर्धा यशस्वी करूया. राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा खेळ पाहून आमच्या खेळाडूंना एक प्रेरणा नक्कीच मिळेल.