पणजी : आमदार म्हणून माझ्यासाठी आधी मुख्यमंत्री व नंतर माझा पक्ष, असे म्हणत मांद्रेंचे आमदार जीत आरोलकर यांनी लोकसभेत भाजपने कोणालाही उमेदवारी दिली तरी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणेच मी काम करीन, असे जाहीर केले.
मांद्रेंचे माजी आमदार दयानंद सोपटे यांना लोकसभेचे तिकीट दिले तर तुम्ही काम करणार का? असा प्रश्न केला असता जीत म्हणाले की, 'मुख्यमंत्री जे निर्देश देतील ते माझ्यासाठी शिरसावंद्य असतील. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष सरकार सोबत आहे. सावंत सरकारला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि सरकारकडून व खास करून मुख्यमंत्र्यांकडून मला वेळोवेळी सहकार्य मिळत आहे. माझ्या मांद्रें मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी भरपूर कामे केलेली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री जे निर्देश देतील ते मी पाळीन. मग तो उमेदवार कुणीही असला तरी चालेल.'
'पक्ष निवडणुकीपुरता किंवा राजकारणासाठी लागतो'मगो पक्षाचे नेते किंवा मंत्री सुदिन ढवळीकर यांचे आदेश पाळणार नाहीत का?, असा सवाल केला असता ते म्हणाले की 'मगो आणि भाजपचे नेते पक्ष पातळीवर काय ते बोलतील. पण आमदार म्हणून मुख्यमंत्र्यांकडे माझा वरचेवर संवाद होत असतो. आम्ही नेहमी भेटतो. आजही मी माझ्या मतदारसंघातील कामांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो. पक्ष हा निवडणुकीपुरता किंवा राजकारणासाठी लागतो.' माजी आमदार नरेश सावळ यांनी मगो नेतृत्वावर पुन्हा तोफ लागलीय त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, माझे सर्वांकडे संबंध चांगले आहेत. मी त्याबद्दल काही बोलणार नाही.'