वासुदेव पागी, पणजी
पणजीः सलग दुसऱ्या दिवसी सत्ताधारी पक्षाने विधानसभेचे कामकाज रोखून धरताना कॉंग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी सभापतीच्या कथित अवमान प्रकरणात माफी मागण्याचा आग्रह धरून गदारोळ केला. त्यामुळे कामकाज तब्बल दोनवेळा तहकूब करण्यात आले.
पावसाळी अधिवेशन सुरू होऊन दोन दिवस झाले तरी अजून प्रश्नकाळ झालेला नाही. त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे खुद्द सत्ताधाऱ्यांनीच गदारोळ करून कामकाज रोखून धरल्यामुळे सभापती रमेश तवडकर यांना कामकाज तहकूब करावे लागले. सत्ताधाऱ्यांनीच सलग दोन दिवस प्रश्नकाळ रोखून धरण्याची गोव्याच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
मुद्दा होता एल्टन डिकॉस्टा यांनी सभापती विषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाचा. डिकॉस्टा यांचा एसटी आरक्षणासंबंधीचा खाजगी ठराव सभापतींनी न स्विकारल्यामुळे ते विधान डिकॉस्टा यांनी चार दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केले होते. वास्कोचे भाजप आमदार दाजी साळकर यांनी हा मुद्दा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपस्थित करताना डिकॉस्टा यांनी सभापतींचा अवमान केल्याचा दावा केला आमि त्यांच्याविरुद्ध हक्कभंगाच्या कारवाईची मागणी केली होती. अन्यथा किमान डिकॉस्टा यांनी सभापतींची माफी मागावी असा आग्रह विरोधी सदस्यांनी धरला होता. डिकॉस्टा यांनी माफी मागण्यास नकार दिल्यामुळे सत्ताधारी सदस्यांनी गदारोळ केला. सोमवारी दोनवेळा आणि आज मंगळवारीही दोनवेळा गदारोळ करून प्रश्नोत्तराचे कामकाज होऊ दिले नाही. त्यामुळे दोन्ही दिवस कामकाज तहकूब करावे लागले.