लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: डिचोली पोलिसांनी दोन वेळा नोटीस पाठवूनही चौकशीला उपस्थित न राहिल्यामुळे आरएसएसचे माजी गोवा संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांना जामीन नाकारण्यात आला असल्याचे उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिलेल्या निवाड्यातून स्पष्ट होत आहे. वेलिंगकर यांना आपली भूमिका खरी वाटत आहे तर त्यांनी चौकशीला सामोरे जायला हवे होते, असेही न्यायमूर्ती बॉस्को रॉबर्ट यांनी दिलेल्या निवाड्यात म्हटले आहे.
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांची डीएनए चाचणी व्हावी असे वक्तव्य केल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करून वेलिंगकर यांच्याविरुद्ध डिचोली पोलिस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली आहे. तक्रारीला अनुसरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. वेलिंगकर यांनी केलेल्या अटकपूर्व जामीनवर सोमवारी सुनावणी पूर्ण होऊन रात्री नऊ वाजता निवाडा देण्यात आला. वेलिंगकर यांचा जामीन अर्ज फेटाळला. पोलिसांनी दोन वेळा नोटीस बजावल्यानंतरही वेलिंगकर चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत, हा सरकारी वकिलांचा युक्त्तिवादच जामीन नाकारण्यास पुरेसा ठरला.
वेलिंगकर यांच्या बाजूने जामीनसाठी अॅड. सुरेश लोटलीकर यांनी तीनम मुद्यांवर युक्तिवाद केला होता. पोलिसांना वेलिंगकर यांची कोठडीतील चौकशी का हवी आहे? असा त्यांचा प्रश्न होता, रिकव्हरीचा प्रश्न उद्भवत नाही, पुरावे नष्ट करण्याची भीती नाही आणि साक्षिदारांना धमकावण्याचाही प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे पोलिस कोठडीतील चौकशी मागणे हे राजकीय हेतूने केले जात आहे असा त्यांचा दावा होता.
हरकत याचिकांत युक्तिवाद करताना धार्मिक भावना दुखावण्यावर अधिक भर देण्यात आला होता तर सरकारी वकिलांकडून तपासाला सहकार्य न करण्यावर भर दिला.
उच्च न्यायालयात देणार आव्हान
वेलिंगकर यांच्यावतीने अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी आव्हान याचिका सादर करण्यात येणार अशी अपेक्षा होती. परंतु आता आज, बुधवारी याचिका सादर केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.