- सुशांत कुंकळयेकर
मडगाव: दुबईतून तस्करीच्या मार्गाने गोव्यात आणल्या गेलेल्या विदेशी सिगारेटस् पुणे व मुंबईतील बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत, अशी माहिती गोवा कस्टमच्या डीआरआय सुत्रांकडून मिळाली आहे. सध्या गोव्यात गाजत असलेल्या 4.5 कोटींच्या विदेशी सिगारेटस् तस्करीची व्याप्ती बरीच मोठी असून 2017 पासून गोव्यात ही टोळी कार्यरत आहे.
गेल्या ऑक्टोबर महिन्यात डीआरआयने दाबोळी येथील कार्गो विभागामध्ये छापा टाकून साडेचार कोटींच्या विदेशी सिगारेटस् पकडल्या होत्या. या प्रकरणात आतापर्यंत गोवा कस्टमचा उपायुक्त महेश देसाई याच्यासह पणजीतील व्यावसायिक परमिंदर छड्डा व वास्कोतील एजंट महमद सोहेब या तिघांना कॉफेपोसाखाली स्थानबद्ध करण्यात आले आहे. या टोळीत सहा ते सात कस्टम अधिका-यांबरोबरच किमान 20 जणांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तस्करीच्या मार्गाने आलेल्या या सिगारेटस् एअर अरेबियाच्या कार्गो विमानातून गोव्यात आणल्या गेल्या होत्या. कस्टमच्या सुत्राकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे, मुंबई व पुणे याचबरोबर हैदराबादलाही हा सिगारेटस् च्या कन्साईन्टमेंट पाठविण्यात आला होत्या. मागचे सहा महिने या व्यवहारावर पाळत ठेवून असलेल्या डीआरआयने या सर्व व्यवहाराची माहिती मिळविल्याने या प्रकरणी पुण्या, मुंबईतही काहीजणांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कस्टमच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, कस्टम अधिकारी आणि तस्कर यांनी एकमेकांशी मिलीभगत करुन हा माल गोव्यात आणण्याचे काम केले होते. यासाठी गोवा आणि कासरगोडच्या काही प्रवाशांचा वापर करण्यात आला होता. विदेशात जाणारे प्रवासी कित्येकवेळा आपले सामान आपण येत असलेल्या विमानातून न आणता कार्गो विमानातून मागवून घेतात. त्यानंतर कस्टमच्या वेअर हाऊसमध्ये जाऊन हा माल सोडविला जातो. ही तस्करी करण्यासाठी नेमक्या याच पद्धतीचा फायदा उठविण्यात आला.
गोव्यातील तसेच कासरगोडमधील काही प्रवाशांना दुबईत पाठवून नंतर त्यांच्या पासपोर्टचा वापर करुन या प्रवाशांचा माल असे दाखवून प्रत्यक्षात या विदेशी सिगारेटस् गोव्यात आणल्या जात होत्या. अशा व्यवहारात तस्करांना मदत करणा-या प्रवाशांना यासाठी प्रत्येकी दहा हजाराची बिदागी दिली जात होती. अशा 40 प्रवाशांच्या जबान्या सध्या डीआरआयने नोंदवून घेतलेल्या असून या प्रवाशांनी पैशांसाठी आपण हे काम केले. मात्र आपल्या नावे आलेला माल नेमका कशाप्रकारचा होता हे आपल्याला ठाऊक नव्हते असे डीआरआयकडे कबूल केले आहे.
सिगारेटस्ची तस्करी करण्याचे कारण स्पष्ट करताना एका अधिका-याने सांगितले, विदेशातून आणल्या जाणा-या सिगारेटस्वर 200 टक्के कर आकारला जातो. हा कर चुकविण्यासाठीच हा तस्करीचा मार्ग वापरण्यात येत होता. सध्या स्थानबद्ध असलेला उपायुक्त महेश देसाई व त्याचे काही साथीदार त्यात सामील होते. ज्या प्रवाशांच्या नावे कार्गोतून हा माल आणला जात होता त्याची तपासणी याच पथकाकडे असायची. त्यामुळे हे अधिकारी तस्करीचा माल हा त्या प्रवाशाचाच माल असल्याचे भासवून बाहेर काढायचे. त्यानंतर या टोळीशी सामील असलेले काही एजंट आपल्या गोदामात हा माल साठवून ठेवायचे. मागच्या ऑक्टोबर महिन्यात ज्यावेळी डीआरआयने छापा घातला त्यावेळी दाबोळी आणि धारगळ येथील दोन गोदामात अशाप्रकारच्या मोठय़ा प्रमाणावर सिगारेटस् सापडल्या होत्या.