ऑनलाइन लोकमतपणजी, दि. २३ : सुरक्षेसाठी असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल व कर्मचाऱ्याचे हातपाय बांधून मेरशी येथील सुधारगृहातून ९ महिलांनी फिल्मी शैलीत पळ काढला. त्यातील तिघांना पुन्हा पकडण्यात आले. पळालेल्या महिला या बांगलादेशी, उजबेकिस्तान आणि नेपाळी होत्या.
ही घटना सोमवारी रात्री ८.३० वाजता घडली. सुधारगृहातील कर्मचारी या महिलांच्या खोलीत गेल्या तेव्हा सर्वांनी तिच्यावर झडप घातली आणि तिला दोरीने बांधून ठेवले. तिचा आक्रोश ऐकून बाहेर असलेली महिला कॉन्स्टेबल तिकडे धावली. या महिलांनी तिलाही खोलीत बंधीस्त केले. त्यानंतर ९ जणांनी तेथून पळ काढला. नंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर शोधाशोध करून तिघांना पुन्हा पकडण्यात पोलिसांना यश आले. पकडण्यात अलेल्या महिला या दिल्ली आणि बांग्लादेश्ी आहेत. परंतु ६ जण अद्याप मिळाल्या नाहीत. त्यात ४ महिला बांगलादेशी, एक उजबेकिस्तान आणि १ नेपाळी युवतीचा समावेश आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा शोध चालू होता.
या प्रकरणात माहिती देताना महिला आणि बालकल्याण खात्याच्या संचालक शिल्पा शिंदे यांनी सांगितले की सर्व महिला या संरक्षक भिंतीवरून उड्या टाकून पळाल्या. या महिला पळत असताना सुधारगृहाच्या वाहन चालकाने पाहिले आणि त्वरित संचालकांना याची माहिती दिली.
दरम्यान पळण्याचे कारस्थान हे अत्यंत नियोजनबद्दरित्या रचण्यात आले होते असे उघड झाले आहे. कारण सुधारगृहाच्या महिलेचा आक्रोश ऐकून महिला पोलीस धावून येणार आणि तिलाही बधीस्त करून तिच्याकडे असलेल्या प्रमुख दाराच्या किल्ल्या घेऊन तेथून निसटणार हा त्यांचा बेत होता. हा बेत त्यांनी यशस्वीही केला.