लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यातील वाढते अपघात आणि वाहतूक नियमांचे पालन योग्यप्रकारे होत नसल्याचे लक्षात येताच वाहतूक नियम आणि दंडात प्रचंड प्रमाणात वाढ केली आहे. दंडाची रक्कम तर पूर्वीपेक्षा तिपटीने वाढविण्यात आली आहे. तरीही अनेक लहान-लहान गोष्टींकडे वाहनचालक दुर्लक्ष करताना दिसतात.
परंतु, या लहान गोष्टी चालकाला बऱ्याच महागात पडू शकतात. नियम कडक करण्यात आल्यानंतर हेल्मेट वापरणे, सीटबेल्ट लावणे, बेशिस्तपणे वाहने चालविणे या गोष्टी नियंत्रणात आल्या असल्या तरी पीयूसी, विमा, नंबरप्लेट याकडे मात्र वाहनचालक अजूनही दुर्लक्ष करत आहेत, असे दिसून येते. या सर्व गोष्टींसाठी खर्च खूप कमी येत असला, तरी या गोष्टी केल्या नाहीत तर हजारो रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
...तर विमा नाकारला जाऊ शकतो
वाहनांचा विमा करायला पीयूसीची आवश्यकता असते. पीयूसीसोबत आरसी बुकदेखील आवश्यक असते. खास करून जेव्हा नव्याने विमा करण्यात येतो, तेव्हा पीयूसी आवश्यक असते. पीयूसी नसल्यास विमा नाकारला जाऊ शकतो.
सर्वच वाहनांना पीयूसी बंधनकारक
पीयूसीद्वारे वाहन किती प्रदूषण करते, हे स्पष्ट होते, त्यामुळे सर्वच वाहनांना पीयूसी आवश्यक असते. यातून कुठल्याही वाहनाला सूट दिलेली नाही.
१०० रुपयांसाठी हजारांचा दंड
पीयूसी करण्यासाठी जेमतेम १०० रुपये लागतात, तरीदेखील अनेक वाहनचालक पीयूसी करत नाहीत. पण पीयूसी नसल्याने हजारो रुपयांचा दंड भरावा लागतो.
पीयूसी नसेल तर दंड किती?
- पीयूसी नसेल तर वाहनचालकाला सुमारे १० हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.
- प्राथमिक स्तरावर वाहतूक पोलिस चलन काढू शकतो, परंतु दंड किती द्यावा, हे मात्र न्यायालय ठरवत असते.
सहसा पीयूसी अनेकांकडे असते, पण तरीही अनेकजण असे आहेत, जे पीयूसी काढत नाहीत. त्यांना नंतर न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागते. अनेकांनी पीयूसी काढलेली असते, परंतु वाहनांची कागदपत्रे सोबत घेऊन फिरत नाहीत. अशावेळी त्यांना दंडव लागतो. यासाठी वाहनचालकांनी आवश्यक कागदपत्रे वाहनातच ठेवणे गरजेचे आहे. - चेतन सावलेकर, ट्रॅफिक पोलिस निरीक्षक, पणजी4
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"