पणजीः कला अकादमीच्या बांधकाम प्रकरणाची सभागृह समिती नियुक्त करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी करून विरोधकांनी केली होती, परंतु मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी त्या ऐवजी कलाकारांची समिती नियुक्त करून समितीच्या सूचना घेणार असल्याचे आणि त्यानुसार सुधारणा करणार असल्याचे सांगितले. मात्र सभागृह समिती मार्फत चौकशी करण्याची मागणी फेटाळली.
कला अकादमीच्या नूतनीकरण कामाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. या एकाच मुद्द्यावर विरोधकांकडून सातत्त्याने सरकारला कोंडीत पकडणम्याचे प्रयत्न या अधिवेशनात झाले. मंगळवारीही हाच मुद्दा उपस्थित करताना आमदार विजय सरदेसाई यांनी कला अकादमीच्या नूतनीकरण कामाची चौकशीची मागणी केली. ही चौकशी सभागृह समितीद्वारे करण्यात यावी असे त्यांनी सांगितले. या मागणीला इतर विरोधी सदस्यांनी पाठिंबा दिला. वेन्जी विएगश आणि युरी आलेमाव यांनीही सभागृह समितीकडून चौकशीची मागणी केली. वेन्जी विएगश यांनी तर पोलीसात गुन्हा नोंदविण्याची मागणी केली.
मुख्यमंत्र्यांनी सभागृह समितीद्वारे चौकशी करण्याची मागणी फेटाळली. परंतु विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे विचारात घेण्यात येणार असल्याचे सांगितले. सरदेसाई यांनी केलेली चार्ल्स कुरैय्या फाउंडेशनच्या सूचना विचारात घेण्याची मागणी केली होती ती मागणी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केली. तसेच युरी आलेमाव यांनी लाईट्स, ध्वनियंत्रणे या विषयीचे उपस्थित केलेले तांत्रिक मुद्देही विचारात घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.