मडगाव - मासळीवर कथितरित्या घातले जाणा-या फॉर्मेलिन प्रकरणामुळे सध्या संपूर्ण गोवा राज्यात एक प्रकारचे भीतीचे वातावरण अजूनही कायम असताना मडगावचे वकील अॅड. राजीव गोमीस यांनी पुन्हा एकदा या प्रकरणी नव्याने याचिका मडगाव न्यायालयात दाखल केली. या नव्या याचिकेत मडगावात आणलेल्या मासळीची चाचणी करणाऱ्या एफडीएच्या फिल्ड ऑफिसर आयवा फर्नाडिस यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या प्रकरणातील संशयितांवर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी या नवीन याचिकेत करण्यात आली आहे.
शुक्रवारी अॅड. गोमीस यांनी मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयात ही याचिका दाखल केली. यापूर्वी आपण जी याचिका दाखल केली होती त्यावेळी आपल्याला आयवा फर्नाडिस यांनी सादर केलेल्या अहवालाची माहिती नव्हती म्हणून ही फेरयाचिका दाखल केल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी अॅड. गोमीस यांनी याप्रकरणी जी याचिका दाखल केली होती त्यात एफडीएच्या संचालक ज्योती सरदेसाई यांना प्रतिवादी केले होते. मात्र नंतर त्यांनी ही याचिका मागे घेतली होती.या प्रकरणाची पाश्र्र्वभूमी अशी की, 15 जुलै 2018 रोजी एफडीएने मडगावात मासळी घेऊन आलेल्या 17 ट्रकांची तपासणी केली असता, त्यातील प्राथमिक चाचणीत मासळीवर फॉर्मेलीन घातल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर हे नमुने एफडीएच्या पणजीच्या प्रयोगशाळेत पाठविले असता, माशांवर सापडलेला फॉर्मेलिनचा अंश खाण्यायोग्य (परमिसिबल लिमिट) असल्याचा निष्कर्ष वरिष्ठ वैज्ञानिक चंद्रकांत कांबळी यांनी केलेल्या चाचणीनंतर घोषित करण्यात आले होते.मात्र फॉर्मेलिन हे रसायन आरोग्याला घातक असून त्यात खाण्यायोग्य पातळी असा कुठलाही निष्कर्ष नसतो असे नमूद करुन ज्याअर्थी एफडीएने नंतर पकडलेले ट्रक सोडून दिले त्याअर्थी एफडीएने मासळी निर्यातदारांच्या दबावाखाली येऊन सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न केला असे नमूद करुन या प्रकरणात न्यायालयाने फातोर्डा पोलिसांना संबंधितांवर भादंसंच्या 120 (ब) (कटकारस्थान रचने), 202 (जाणुनबुजून माहिती लपविणो), 273 (अपायकारक वस्तूची विक्री करणो), 420 (फसवणूक करणो) व 304 यासह 511 (सदोष मनुष्यवधाचा गुन्हा करण्याचा प्रयत्न करणो) या कलमाखाली एफआयआर नोंद करुन चौकशी करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी केली आहे.