पणजी : गोवा सरकारने पुढील पंधरा दिवसांसाठी इतर राज्यांमधून होणाऱ्या मासळी आयातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे पुढील 15 दिवस गोव्यातील खवय्ये तसेच येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना मासळीपासून वंचित राहावे लागणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ तसेच अन्य मासळी राज्यांमधून आयात केलेल्या मासळीत फॉर्मेलिन हे घातक रसायन आढळल्यानं गेले काही दिवस राज्यात खळबळ उडाली आहे.
अन्न व औषध प्रशासनाने गेल्या आठवड्यात आंध्र प्रदेशचे 17 ट्रक जप्त करून मासळी ताब्यात घेतली आणि चाचणी केली असता काही प्रमाणात फॉर्मेलिन सापडले होते. परंतु व औषध प्रशासनाने त्याच दिवशी सायंकाळी आपला अहवाल बदलून फॉर्मेलिन मर्यादित स्वरूपात असल्याचे जाहीर केले होते. परंतु गोव्यातील लोकांनी मासळी खरेदीची एवढी धास्ती घेतली होती की गेले आठ दिवस मासे बाजार ओस पडले होते.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज आयात बंदीचा निर्णय जाहीर करताना फळे तसेच आयात होणाऱ्या भाज्या प्रशासनाच्या स्कॅनरखाली असतील, कृत्रिमरित्या पिकविलेली फळे तसेच भाज्या घेऊन येणारे ट्रक तपासले जातील, असेही सांगितले. आंध्र प्रदेश, केरळ व अन्य राज्यांमधून रोज सुमारे 200 टन मासळी गोव्याच्या बाजारपेठेत येते. गोव्यात सध्या पावसाळ्यात मासेमारी बंदी असून 1 ऑगस्टला ती उठणार आहे. त्यानंतर गोव्याचे ट्रॉलर्स समुद्रात जाऊन मासेमारी करू शकतात त्यामुळे स्थानिक मासे उपलब्ध होणार असून आयातीवर अवलंबून राहावे लागणार नाही असे पर्रीकर म्हणाले.