पणजी : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट गोव्यात स्थापन झाला असून प्रदेशाध्यक्षपदी शंभू मधुकर परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी काल नियुक्तीचा आदेश काढला. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर गोव्यात काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. परंतु राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी गोव्यात पक्ष एकसंध असल्याचा दावा करून सर्वजण शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले होते.
गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही काळापासून आलबेल नव्हतेच. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पक्षाच्या कोणत्याही हालचाली दिसत नव्हत्या. फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने अकरा उमेदवार उभे केले परंतु एकालाही विजयी प्राप्त करता आला नाही. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर गोव्यात पक्षाचे काम पूर्णपणे थंडावले होते. या पार्श्वभूमीवर अजित पवार गट गोव्यात दाखल झाल्याने आता राजकारणाला नवी गती येईल.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'शंभू परब हे राष्ट्रवादीच्या कार्यालयात कारकून म्हणून काम करत होते. प्रफुल्ल पटेल यांनी त्यांना अध्यक्ष बनवले, त्यामुळे त्यांचे कौतुकच करावे लागेल. मी शरद पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष असून शंभू यांच्या नियुक्तीबद्दल मला फारसे काही बोलायचे नाही. माझी नियुक्ती शरद पवार यांनी अध्यक्ष म्हणून केलेली आहे आणि आमचे काम चालू आहे. गुरुवारी शरद पवार यांनी सर्व प्रदेशाध्यक्ष, पक्षाचे खासदार, आमदार यांची दिल्लीत बैठक बोलावली असून या बैठकीसाठी मी दिल्लीला जाणार आहे.