पणजी : राज्याचे माजी महसूल मंत्री डॉ. विल्फ्रेड मिस्किता (७०) यांचे सोमवारी (दि. ८) रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. त्यांचे पार्थिव मंगळवारी गोव्यात आणले जाणार आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक विवाहित मुलगा आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते सक्रिय राजकारणापासून दूर होते.
१४ एप्रिल १९४९ रोजी दिवाड येथे जन्मलेल्या मिस्किता यांनी गोमेकॉमधून एमबीबीएसची पदवी घेतली. तसेच जीएस मेडिकल कॉलेज अँड कॉलेज आॅफ फिजिशियन्स अँड सर्जन्स मुंबई येथून त्यांनी एमडी (गायनॅकॉलॉजी) पूर्ण केले. वास्को येथे त्यांनी स्त्री रोग तज्ञ म्हणून काम केले. १९७४ साली ते मगोच्या युवा शाखेचे संस्थापक उपाध्यक्ष होते. मगो पक्षाच्या तिकिटावर त्यांनी प्रथम वास्को विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले.
२००७ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी भाजपाचे राज्य उपाध्यक्ष, प्रवक्ते पद सांभाळले. तसेच एनआरआय आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले.