वास्को: गोव्याचे माजी नगरविकास तथा महसूलमंत्री जॉन मानुवेल वाझ यांचे शुक्रवारी (7 डिसेंबर)पहाटे हृदयविकराच्या झटक्याने निधन झाले. तीन दिवसांपूर्वी वाझ जास्त आजारी झाल्यानंतर त्यांना त्वरित उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. वयाच्या ७९ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जॉन मानुवेल वाझ १९९४ सालात अपक्ष म्हणून मुरगाव मतदारसंघातून भरघोस मतांनी आमदार म्हणून विजयी झाले होते. याच काळात त्यांनी गोव्याचे नगरविकासमंत्री तसेच महसूलमंत्री पद सांभाळलेले आहे. वाझ १९९४ सालात आमदार बनण्यापूर्वी १९८९ सालात मगो पक्षावरून मुरगाव मतदारसंघातून निवडणूक लढवली होती व तेव्हा त्यांना फक्त २२२ मतांनी पराभव पत्कारावा लागला होता.
वाझ मुरगाव नगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष पदाची खुर्ची सांभाळलेली होती. बायणा भागात असलेली वैश्यावस्ती हटवणे हे त्याकाळात त्यांचे एक मोठे स्वप्न असून मुरगावचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी बायणा वैश्यावस्ती साफ करण्याची मोठी मोहीम सुद्धा सुरू केली होते. वैश्यावस्तीमुळे बायणा समुद्र किनाऱ्यावर सामान्य लोक जाण्यास घाबरायचे, मात्र वाझ यांनी ही वस्ती हटवण्याची मोहीम सुरू केल्यानंतर येथे काही सांस्कृतीक कार्यक्रम सुद्धा झाले असून त्याकाळात मोठ्या प्रमाणात नागरीकांनी बायणा किना-याला भेट सुद्धा दिली होती. जॉन मानुयेल वाझ यांनी बायणा वैश्यावस्ती हटवण्याची मोहीम सुरू केली होती, मात्र यानंतर काही कारणामुळे भविष्यात ती थंडावली असून नंतर २००४ सालात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बायणा वैश्यावस्ती येथून पूर्णपणे जमीनदोस्त केली. १९९९ सालात जॉन मानुयेल वाझ यांना मुरगाव मतदारसंघातून निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. यानंतर २००२ सालात झालेल्या निवडणूकीत जॉन मानुयेल वाझ यांचे पूत्र जीवोनी कार्ल वाझ काँग्रेस पक्षावरून मुरगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर २००७ सालात झालेल्या पुढच्या निवडणुकीत त्यांचे पुत्र मुरगाव मतदारसंघातून पराभूत झाले.
जॉन मानुयेल वाझ एक चांगल्या राजकीय नेत्याबरोबरच ते एक चांगले उद्योजक सुद्धा होते. पाव बनवण्याच्या उद्योगात त्यांचे गोव्यात मोठे नाव होते. शुक्रवारी पहाटे त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव शरीर बायणा, वास्को येथील त्यांच्या निवास्थानावर अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून शनिवारी (८ डिसेंबर) संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंतिमविधी करण्यात येणार अशी माहीती त्यांच्या जवळच्यांनी दिली.