पणजी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी गोवा संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर हे शेवटी पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपाविरुद्ध पोटनिवडणूक लढविणार आहेत. त्याविषयीची घोषणा शुक्रवारी (26 एप्रिल) पणजीत करण्यात आली आहे. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतरची सहानुभूती पणजीत आता निश्चितच नाही, पर्रीकरांविषयी लोकांना आदर असला तरी, पणजीचे मतदार शेवटी पणजीचे हित लक्षात घेऊनच मतदान करतील, ते कुणा एका कुटूंबाला मते देणार नाहीत, असे सुभाष वेलिंगकर यांनी सांगितले आहे.
गोवा सुरक्षा मंचातर्फे वेलिंगकर लढणार आहेत. सुरक्षा मंचाचे मार्गदर्शक अरविंद भाटीकर यांनी वेलिंगकर यांच्या नावाची पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली आहे. पणजीतील लोकांनी वेलिंगकर यांनाच तुम्ही उमेदवार म्हणून उभे करा, आम्ही पाठींबा देऊ असे आम्हाला सांगितले व त्यामुळे सुरक्षा मंचाने वेलिंगकर यांचे नाव निश्चित केल्याचे अरविंद भाटीकर म्हणाले आहेत.
पांडुरंग नाडकर्णी, किरण नायक, महेश म्हांब्रे, अॅड. स्वाती केरकर, श्री. खंवटे आदी यावेळी व्यासपीठावर होते. सुभाष वेलिंगकर म्हणाले, की आपण पणजीमध्येच लहानाचा मोठा झालो. आपला जन्म पणजीत झाला. भाजपाने पणजीत फक्त बाबूश मोन्सेरात यांच्या सोयीचेच राजकारण केले. त्यासाठी ताळगाव मतदारसंघाचा भाजपाने बळी दिला. वेलिंगकर म्हणाले, की पणजीची गेली पंचवीस वर्षे लुट झाली. पणजी शहर फसविले गेले. स्मार्ट सिटीच्या नावाखाली विकास किती झाला व कमिशन किती खाल्ले गेले हे पणजीवासियांना ठाऊक आहे. आम्हाला तत्त्वाधिष्ठीत राजकारण करायचे आहे. पर्रीकर यांच्याविषयी पणजीवासियांना आदर आहे पण निधनानंतर सहानुभूती राहिलेली नाही. आदराचा लाभ हा भाजपाला होणार नाही. कारण पर्रीकर यांच्या अस्थी कलशावेळीही काहीच गर्दी नव्हती. बांबोळीतील मोदींच्या सभेलाही गर्दी झाली नाही. पणजीचे हित कोणत्या गोष्टीत आहे ते पाहून पणजीवासिय मतदान करतील.
मी काय आहे ते गोमंतकीय ठरवतील- उत्पल पर्रीकर
मी काय आहे ते पणजीवासीय आणि गोमंतकीय माझ्या कामावरून ठरवतील. माझ्या कामावरूनच माझी राजकीय पात्रता ठरेल. भाजपची वाढ ही स्वत: माझ्या घरापासून पाहिलेली आहे. भाजपने काहीही सांगितल्यास मी ते करेन, कोणतीही जबाबदारी पार पाडेन, असे दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी शनिवारी येथे पत्रकारांना सांगितले होते. गोवा सुरक्षा मंचचे प्रमुख प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी उत्पल हे निवडणुकीच्या राजकारणात येणार नाहीत, कारण ते पॉलिटीकल मटेरियल नव्हे पण ते सद्गृहस्थ आहेत अशा अर्थाचे भाष्य केले होते. त्यावर पत्रकारांनी विचारताच उत्पल म्हणाले की खरे म्हणजे मला अशा विषयांवर भाष्य करायचेच नाही. तथापि, मी काय मटेरियल आहे हे लोकच निश्चित करतील. मी सदगृहस्थ आहे असेही सुरक्षा मंचाच्या नेत्याने म्हटलेय हेही माङयासाठी स्वागतार्ह आहे. मी काय आहे हे पणजीवासिय ठरवतील.