लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली: साखळी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. बुधवारी एका मोठ्या राजकीय खेळीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी साखळीतील दोन माजी नगराध्यक्षांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यात त्यांना यश मिळाले आहे. त्यामुळे साखळीतील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार माजी नगराध्यक्ष रियाज खान आणि माजी नगराध्यक्ष राया पार्सेकर यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. हे दोघेही रितसर भाजप प्रवेश करतील. पक्षातर्फे रियाज खान यांना प्रभाग आठमधून तर राया पार्सेकर यांच्या प्रभाग सहामधून महिला उमेदवार (राया पार्सेकर यांच्या आई) रिंगणात असतील.
हे दोन्ही माजी नगराध्यक्ष भाजपवासी होणार हे जवळजवळ निश्चित झाले असून मुख्यमंत्र्यांची खेळी यशस्वी ठरल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपचे बळ आणखी वाढणार आहे. मुख्यमंत्री सातत्याने साखळी पालिका निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी सर्व पर्यायांचा अभ्यास करून सावध पावले उचलत असल्याचे दिसून येते.
दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, 'साखळी हे छोटे शहर राज्यात चांगल्या पायाभूत सुविधा असलेले शहर आहे. येथे केजी ते पीएच.डी. पर्यंत शिक्षणाच्या सुविधा आहेत. कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, बालोद्यान, रस्ते, पूल, उत्तम आरोग्य सुविधा असे जाळे आहे. त्यामुळे हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. शहर सुंदर हरित, सुरक्षित करण्याचा आमचा ध्यास आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत भाजप जोरदार मुसंडी मारण्यास सज्ज आहे. आमची तयारी जोरात सुरू असून चांगले यश मिळेल' असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
प्रभाग दहामधून बोर्येकर निश्चित
भाजपतर्फे काही प्रभागांतील उमेदवार निश्चित झाले आहेत. दोन दिवसांत अधिकृत यादी जाहीर होणार आहे. प्रभाग दहामधून दयानंद बोर्येकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
बैठकांचे सत्र सुरुच
दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या इतर व्यस्त कामातूनही बुधवारी निवडणुकीसाठीच्या बैठकांचे सत्र सुरु ठेवले. विरोधी गटातील काहींनी त्यांची भेट घेऊन रणनीतीबाबत चर्चा केली.
टुगेदर फॉर साखळी पॅनलची तयारी
दुसरीकडे टुगेदर फॉर साखळीने आपल्या पॅनलची तयारी सुरू ठेवली आहे. यंदाही चांगले उमेदवार पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहेत असे टुगेदर फॉर साखळीचे प्रमुख प्रवीण ब्लेंगन, राजेश सावळ यांनी सांगितले.
पालिका क्षेत्राचा झपाट्याने विकास साधला
भाजपचे सर्व बारा उमेदवार शुक्रवारपर्यंत निश्चित होतील. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या उपस्थितीत ही नावे जाहीर करण्यात येणार आहेत. साखळी पालिकेची सत्ता आमच्याकडे नसली तरी विकासकामांत आम्ही मोठे यश मिळविले आहे. पालिका क्षेत्राचा झपाट्याने विकास साधला आहे. मास्टर प्लॅनची पन्नास टक्के कार्यवाही केली आहे. आगामी काळात उर्वरित कामे पूर्ण करू. - प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"