नरेंद्र सावईकर, माजी खासदार
६ एप्रिल १९८० या दिवशी भारतीय जनता पक्षाची दिल्ली येथे स्थापना झाली. त्या घटनेला आज ४३ वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणजेच आज भारतीय जनता पक्षाचा ४४ वा स्थापना दिवस आहे. राजकीय पक्षाचेदेखील आयुष्य असते व आहे. राजकारण ही एक सतत चालणारी प्रक्रिया भारताने स्वीकारलेल्या लोकशाही पद्धतीत राजकीय संघटन किंवा पक्ष यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. एक राजकीय पक्ष असूनसुद्धा इतर राजकीय पक्षांपेक्षा भारतीय जनता पक्षाची ओळख वेगळी आहे.
भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली तीच मुळात वैचारिक आधारावर तत्कालीन जनता पक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या वैचारिक बांधिलकीतून उफाळून आलेल्या मतभेदांचा परिणाम म्हणून भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. सुरुवातीला तर सत्तेच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाचा विचारसुद्धा केला जात नव्हता. १९८४ साली तर लोकसभेतले संख्याबळ अवघ्या दोन खासदारांवर आले होते. संख्येच्या बळावर काँग्रेसने दिल्लीतील सत्तेला पूर्ण विळखा घातला होता. त्या परिस्थितीत सत्ता तर सोडाच, पण पक्षाचे अस्तित्व तरी टिकेल का अशी चर्चा सर्व माध्यमात चालायची. पण त्यामुळे खचून न जाता त्यावर मात करण्याचे आव्हान स्वीकारत भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन नेते व कार्यकर्ते यांनी कार्य सुरूच ठेवले. व तिथूनच पक्षाच्या वेगळेपणाचा परिचय झाला. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तब्बल ८३ खासदार निवडून आले. त्याचवेळी गोव्यातदेखील श्रीपादभाऊ नाईक, राजेंद्र आर्लेकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, दत्ता खोलकर, सतीश धोंड यांच्यावर भारतीय जनता पक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली.
१९९१ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची लोकसभेतील सदस्यसंख्या १२० वर पोहोचली. (स्व.) मनोहर पर्रीकर यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश हा त्याच काळातला आहे. त्यानंतर १९९६ साली १६१, १९९८ व १९९९ साली १८२, २००४ साली १३८, २००९ साली ११६, २०१४ साली २८२ व २०१९ साली ३०३ अस हा लोकसभेतील सदस्यांच्या संख्येचा क्रम राहिला. २०१४ साली तब्बल ३० वर्षांनी भारतातील जनतेने पूर्ण बहुमताचे एकाच राजकीय पक्षाचे सरकार निवडून दिले.
गोव्यातील कामाची सुरुवातदेखील अशीच. विधानसभेतील सदस्यसंख्या अशीच क्रमाक्रमाने वाढणारी १९९४ साली ४, १९९९ साली १०, २००२ साली १७, २००७ साली १४, २०१२ साली २१, २०१७ साली १३ व २०२२ साली २० व २८. काळानुरूप विकसित होत जाणारे भारतीय विचार, तत्त्वज्ञान व संस्कृती यांचे प्रतिबिंब भारतीय जनता पक्षाच्या कार्यात दिसते. या देशाच्या राजकारणात कोणता राजकीय पक्ष तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर करत असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. म्हणूनच तर सदस्यता पावतीची जागा ऑनलाइन पावतीने घेतली. आज समाजमाध्यमे (सोशल मीडिया) हे एक अत्यंत प्रभावी माध्यम. पण, भारतीय जनता पक्षाचे नेते, कार्यकर्ते व हितचिंतक याचा खुबीने उपयोग करत पक्ष व सरकारचे कार्य व विचार जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवत आहेत. राजकारण म्हणजे निवडणूक आलीच व निवडणुकीसाठी सर्वांत महत्त्वाची म्हणजे बूथ यंत्रणा. ती नीट असेल तर काम सोपे होते. ९२ कोटी मतदारांसाठी मतदानासाठी सर्वसाधारण १० लाख बूथ आहेत, असे धरल्यास या सर्व बूथपर्यंतची यंत्रणा उभी करणे ही राजकीय पार्टीसाठी सोपी गोष्ट नाही. पण तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत आज भारतीय जनता पक्ष ही यंत्रणा उभी करत आहे. आणि यासाठी कोणती एजन्सी नसून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक बूथवर जाऊन हे काम करीत आहेत, हे नमूद करावे लागेल. कार्यकर्ता राजकीय संघटनेचा आत्मा असतो.
भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती ही कार्यकर्ता केंद्रित व आधारित आहे. कोणतेही राजकीय संघटन हे स्थिर (static) राहू शकत नाही. तसे झाल्यास ते असंबद्ध होऊन जाईल. भारताच्या राजकीय इतिहासाचा अभ्यास केल्यास असे अनेक राजकीय पक्ष नाहीसे झाल्याचे दिसून येते. पण, देश प्रथम हे ब्रीद असलेला भारतीय जनता पक्ष मात्र सर्वांहून वेगळा आहे. देशाच्या विकासात प्रत्येकाचे योगदान आहे व पाहिजे हे ओळखूनच भारतीय जनता पक्षाची वाटचाल सुरू आहे.
कारण कोणताही जिवंत राजकीय पक्ष किंवा संघटन आपल्या कार्याचा विस्तार व प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. नवीन नेते, कार्यकर्ते ज्यावेळी पक्षात प्रवेश करतात, त्यावेळी पूर्वीपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आता माझे काय असे वाटणे स्वाभाविक आहे. पण, इथेच खरी परीक्षा असते. जुन्याचे कष्ट व अनुभव यांचा योग्य सन्मान व सहकार्य व नवीनावर विश्वास व त्याच्या कर्तृत्वाचा उपयोग याची सांगड घालत पुढे जाणे हीच प्रत्येक राजकीय पक्षाची खरी कसोटी असते. भारतीय जनता पक्षातदेखील याला अपवाद नाही. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धतीमुळे भारतीय जनता पक्षानेही सर्वांना सोबत घेत आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. सरकार व संघटन ही दोन चाके. ही दोन्ही चाके एकाचवेळी योग्यपणे चालली तर निर्णय किती प्रभावी ठरतो, हे भारतीय जनता पक्षाने वेळोवेळी दाखवून दिले आहे. यापुढील आव्हानेदेखील मोठी आहेत. २०४७ साली भारताच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावेळी भारत एक वैभवशाली, सामर्थ्यशाली व संपन्न राष्ट्र बनवण्यासाठी कार्यरत राहण्याचे प्रेरणादायी आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. भारतीय जनता पक्ष व या पक्षाच्या विचारांनी संस्कारित नेता व कार्यकर्ताच हे स्वप्न पाहू शकतो. यासाठी सतत कार्यरत राहण्याचा निश्चय आहेच; पण तो सर्व जनतेला जोडत व सोबत घेत आणखीन दृढ करूया हीच याप्रसंगी शुभेच्छा.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"