पणजी : सांकवाळचे माजी सरपंच रमाकांत बोरकर यांनी समर्थकांसह भाजपात प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी माजी राज्यसभा खासदार तथा दक्षिण गोवा लोकसभा निवडणूक निमंत्रक विनय तेंडुलकर उपस्थित होते. कुठ्ठाळी भाजपा मंडल अध्यक्ष नारायण नाईक, अच्युत नाईक, उदय गांवकर व इतर स्थानिक भाजपा नेते उपस्थित होते.
तानावडे म्हणाले की, काँग्रेससह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पत्रादेवीपर्यंत बसने प्रवास करुन भाजपा सरकारने बांधलेले गुळगुळीत रस्ते तसेच मांडवी व झुवारी नदीवरी नव्या पुलांची प्रशंसाच केलेली आहे. कॉंग्रेसच्या कारकिर्दित हे शक्यच नव्हते. मडगाव ते पत्रादेवी व तेथून पुन्हा लोहिया मैदानावर येण्यासाठी एक दिवस लागला असता. काँग्रेसने अटल सेतूच्यावेळी भाजपा सरकारवर टीका केली परंतु आता चांगले फळ दिसून येत आहे, हे या नेत्यांनी मान्य करायला हवे.’
भाजपात प्रवेश केलेले बोरकर हे तब्बल सहावेळा सांकवाळ पंचायतीत पंच म्हणून निवडून आले. बरीच वर्षे ते सरपंच होते. २०१७ साली युगोपाच्या तिकिटावर ते लढले परंतु पराभव पत्करावा लागला. त्यानंतर २०२२ मध्ये पंचायत निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला.