- सूरज पवार
मडगाव- व्हिडीओ व्हायरल प्रकरणी अडचणीत आलेले गोव्याचे माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांना आज शनिवारी न्यायालयाने सर्शत अटकपूर्व जामीन मंजूर केला. मडगाव येथील दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीक्ष सायनोरा लाड यांच्या न्यायालयाने पाशेको यांना वीस हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. जामीन मंजूर करताना अन्य काही अटीही घालण्यात आल्या आहेत. बेताळभाटी परिसरात 15 दिवस तर उत्तोर्डा भागात 60 दिवस जाण्यास बंदी घालण्यात आली असून, पाच दिवस तपास अधिकाऱ्यांनी बोलाविल्यास पोलीस ठाण्यात हजर राहण्यासही बजाविले आहे.
मिकी पाशेको हेही यावेळी न्यायालयात हजर होते. न्यायालयाच्या निवाडयानंतर पत्रकारांशी बोलताना आपल्याविरुध्द नाहक आरोप करण्यात आल्याचा दावा केला. तक्रारदाशी पोलिसांनी हातमिळविणी केली, राजकीय व्यक्तींचा दबाव होता असा आरोप त्यांनी केला. आपल्या अटकपुर्व जामीन अर्जाला विरोध करताना पोलिसांनी जे दावे केले होते त्यात आपल्याविरुध्द पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारींचा समावेश होता. या सर्व तक्रारी यापुर्वीच निकालात काढण्यात आल्या आहेत. आपण निदरेष सुटलेला आहे असे ते म्हणाले. न्यायालयाप्रती आदर असून, न्यायालयावर माझा विश्वास असल्याचेही ते म्हणाले.
आपल्याविरोधातील आरोप खोटारडे आहेत. गुन्हाच घडला नसल्याने कोलवा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद केला तर वेर्णा पोलिसांनी आपल्याविरुध्द दखल पात्र गुन्हा नोंद केला. उत्तोर्डा येथील प्रकरणात तपास अधिका:याने आपण सराईत गुन्हेगार असल्याचे चित्र रंगविले होते. जो व्हिडीओ व्हायरल करण्यात आला तो एंडिटींग केला होता. आपल्याला या प्रकरणात गुंतविण्यामागे कुणीतरी तक्रारदाराला पुढे केले होते असा आरोपही त्यांनी केला.