नारायण गावस, पणजी: अनेक वर्षापासून प्रतिक्षा असलेला कुंभारजुवा मतदारसंघातील गवंडाळी येथील रेल्वे फाटकावरवरील उड्डाण पूल आता लवकर साकारणार आहे. आज सोमवारी कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी सरकारी अधिकाऱ्यांसोबत या रेल्वे फाटकाची पाहणी केली. येत्या २० फेब्रुवारी रोजी या उड्डाण पुलाची पायाभरणी केली जाणार असल्याचे आमदार राजेश फळदेसाई यांनी सांगितले.
एका वर्षात पुल हाेणार पूर्ण
गवंडाळी रेल्वे फाटकावरील उड्डाण पूल एका वर्षात पूर्ण हाेणार आहे. एकूण ७०० मीटर लांबीचा हा उड्डाण पुल असणार असून दोन्ही बाजूंनी ३५० ते ३५० चौरस मीटर जागा असणार आहे. या भागातील लाेकांना विश्वासात घेऊन हा पूल बांधण्यात येणार आहे. २० फेब्रुवारी या पुलाची पायाभरणी झाल्यानंतर एका वर्षात तो पूर्ण हाेणार आहे. या ठिकाणी ज्या लोकांचे जागे हाेते त्यांना याेग्य तो जागेचा माेबदला देण्यात आला आहे, असेही आमदार राजेश फळदेसाई यांनी सांगितले.
लाेकांसाठी ठरणार महत्वाचा
या ठिकाणी उड्डाण पूल अंत्यत गरजेचा आहे. रेल्वे गेट पडल्यावर लाेकांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाया जातो. यामुळे कार्यालयात जाणाऱ्या लोकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. तसेच बांबाेळी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांना या रेल्वे गेटचा फटका बसत आहे. किमान १५ ते २० मिनीट वाट पाहत राहावे लागत आहे. रेल्वे गेट पडल्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही हाेत असते. त्यामुळे या ठिकाणी पुल अत्यंत गरज आहे. लोकांची अनेक वर्षापासून मागणी आहे, असे आमदार राजेश फळदेसाई म्हणाले.
लोकांना विश्वासात घेऊन पुल
या रल्वे फाटकावर उड्डण पूल व्हावा यासाठी अनेक वर्षे मागणी होत होती. मार्शेल साखळीला जाणारे लाेक पूर्वी बाणास्तरीहून जात होते. पण नंतर गवंडाळी नदीवर पूल झाल्यानंतर सर्व वाहतूक या मार्गावरुन सुरु झाली. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडी वाढली. तसेच प्रत्येक तासाने या ठिकाणी रेल्वे गेट पडल्यावर लाेकांचा वेळही वाया जात होता. तसेच वाहतूक कोंडीमुळे अपघातही हाेत हाेते. वाहतूक पाेलीस ठेऊनही ही समस्या सुटली नाही. त्यामुळे आता हा उड्डाण पुल झाल्यावर लाेकांची ही समस्या सुटणार आहे, असे आमदार फळदेसाई म्हणाले.