ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 18 - केंद्र सरकारच्या रिमोट कनेक्टीव्हीटी योजनेखाली महाराष्ट्रातील अकोला, नांदेड, अमरावती व सोलापूर या चार छोटया विमानतळांसह देशातील तब्बल 43 छोटय़ा शहरातील विमानतळ येत्या सहा महिन्यात देशातील मुख्य 72 विमानतळांना जोडले जाणार अशी माहिती केंद्रीय विमान उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी गोव्यात भरलेल्या तीन दिवसांच्या विमानोड्डाणा संदर्भातील जागतिक कार्यशाळेच्यावेळी दिली.
ही कार्यशाळा दक्षिण गोव्यात बाणावली येथील ताज एक्झोटिका या पंचतारांकित हॉटेलात भरली असून त्यात 20 देशांतील सुमारे 50 प्रतिनिधींनी भाग घेतला आहे. ‘नो कंट्री लेफ्ट बिहाईंड’ या आयकावच्या मोहिमेखाली भारतीय विमानतळ प्राधिकरणाने भारतातील या क्षेत्रतील तंत्रज्ञानाविषयी लेबनन, कतार, साऊदी अरेबिया, अफगाणिस्तान, मोरिशियस सारख्या देशांसाठी आपले तंत्रज्ञान खुले केले आहे. विमानोड्डाण क्षेत्रत भारत सरकारने शंभर टक्के विदेशी गुंतवणूकीला चालना देणारे धोरण आखले असल्याचेही यावेळी राजू यांनी सांगितले.
भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि आयटा यांनी संयुक्त विद्यमानाने हवाई महसूल व्यवस्थापनासाठी विकसित केलेल्या ‘स्काय रेव्ह 360’ या सॉफ्टवेअरचे शनिवारी राजू यांनी उद्घाटन केले. या तीन दिवसांच्या कार्यशाळेत भारतीय तंत्रज्ञान इतर देशांसाठी उपलब्ध कसे करता येईल यासंबंधी चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विमानोड्डाण क्षेत्रत जास्तीतजास्त खासगी कंपन्यांनी गुंतवणूक करावी यासाठीच रिमोट कनेक्टीव्हीटी योजना आखली असून महाराष्ट्रातील अकोला, नांदेड, अमरावती व सोलापूर हे चार विमानतळ तसेच कर्नाटकातील बिदर या शहरातील विमानतळ येत्या सहा महिन्यात खुला केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अत्यंत कमी दरात या विमानतळाची सेवा खासगी गुंतवणूकदारांना उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी बोलताना गोव्यातील मोपा विमानतळ मे 2020 र्पयत सुरु होणार असे राजू यांनी सांगितले. हा विमानतळ सुरु झाल्यानंतर काही वर्षातच गोवा सरकारला या विमानतळाच्या उत्पन्नातून 36.99 टक्के महसूल प्राप्त होणार आहे. मोपा विमानतळ सुरु झाला तरी गोव्यातील दाबोळी विमानतळ चालूच रहाणार आहे अशीही ग्वाही त्यांनी दिली. ते म्हणाले, गोव्यात हवाई वाहतूक प्रवासी वाढ दरवर्षी सरासरी 30 टक्के असून राष्ट्रीय सरासरीपेक्षा ही वाढ दहा टक्के वाढ आहे. सध्या दाबोळी विमानतळाची दरवर्षी सात दशलक्ष प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. मोपा विमानतळाची क्षमता आठ दशलक्ष प्रवासी हाताळणारी आहे. गोव्यात येणा:या हवाई प्रवाशांची संख्या पाहता गोव्याला दोन्ही विमानतळांची गरज आहे. एकाच राज्यात दोन विमानतळ एकाचबरोबर चालू रहाणारे गोवा हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे असेही राजू म्हणाले.
यावेळी नागरी विमानोड्डाण खात्याचे सचिव आर. एन. चौबे, आयटाचे क्षेत्रीय उपाध्यक्ष कॉर्नाड क्लिफर्ड, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष गुरुप्रसाद मोहोपात्र, तसेच गोवा विमानतळाचे संचालक डी.सी.एच. नेगी हे उपस्थित होते.