मडगाव: वाशे-लोटली येथे मृत अवस्थेत सापडलेल्या फ्रान्सिस्को काव्र्हालो या 33 वर्षीय तरुणाच्या खुनाचे कोडे दक्षिण गोवा पोलिसांनी अवघ्या 36 तासात सोडवत चार तरुणांना अटक केली. दारुच्या नशेत झालेल्या भांडणातूनच हा खून झाल्याचे उघड झाले आहे. फ्रान्सिस्को आरडाओरडा करत होता. त्यामुळे संतापलेल्या सहा तरुणांनी त्याला फुटलेल्या बाटलीने भोसकले. त्यात त्याचा मृत्यू झाला. एकूण सहाजणांनी हा हल्ला केला होता. यातील दोघे संशयित सध्या फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अटक केलेल्यांची नावे रॉयन आल्वारिस (21), विल्टन कुतिन्हो (34), मेल्बर्न कुतिन्हो (22), वालेन्सियो वाझ (26) अशी असून या चारही संशयितांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, हा मारामारीचा प्रकार राय-मनोरा येथे कार्लटन बारजवळ घडला. या बारमध्ये सर्व सहा संशयित दारु प्यायला बसलेले होते. त्याचवेळी मद्यधुंद अवस्थेत असलेला फ्रान्सिस्को बारमध्ये येऊन दारुसाठी मोठमोठ्याने दंगा करु लागला. त्यामुळे संशयित संतापले. त्यांची फ्रान्सिस्कोसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर रागाच्या भरात संशयितांनी त्याच्यावर फुटलेल्या बाटलीने वार केले. या मारहाणीने मयत बेशुद्ध होऊन पडला असता संशयितांनी त्याला आपल्या मोटरसायकलवर बसवून वाशे-लोटली येथे पुलाजवळ नेऊन टाकून दिले.
6 सप्टेंबर रोजी पोलिसांना बोरी पुलाच्या खाली मृतदेह असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना मृताच्या अंगावर चार जखमा सापडल्या. त्यामुळे पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला होता. कुठलाच सुगावा हाती लागत नसल्याने हा खून पोलिसांसाठी आव्हान बनले होते. या परिस्थितीतही अवघ्या 36 तासात पोलीस खुन्यांपर्यंत पोहोचले असे गावस यांनी सांगितले.
या खूनाचा तपास करण्यासाठी उपअधीक्षक राजीव राऊत देसाई यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक प्रविणकुमार वस्त, संदेश चोडणकर, रवी देसाई, विल्सन डिसोझा, तुषार लोटलीकर, राहुल परब, सलीम शेख, पोलीस शिपाई अविनाश नाईक, सोमनाथ नाईक, अजय नाईक, विकास नाईक, विकास कौशिक व चेतन कोळी यांचे पथक तैनात केले होते. या पथकाने राय-मनोरा भागातील सर्व दारुची दुकाने पिंजून काढून माहिती गोळा केली. त्यात काल्र्टन बारमध्ये दंगा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या.सध्या दोन संशयित आरोपी फरार आहेत. त्यांच्याही शोधात पोलीस असल्याची माहिती गावस यांनी दिली. खुनाचा तपास करणाऱ्या पोलीस पथकाच्या कामगिरीची महानिरीक्षक जसपाल सिंह यांनी दखल घेतली असून पथकातील पोलिसांची नावांच्या शिफारस बक्षिसासाठी करण्यात आली आहे.