पणजी : मुख्यमंत्रीमनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळातील १२ पैकी एकूण चार मंत्री सध्या विदेशात आहेत. यापैकी मुख्यमंत्री पर्रीकर व ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे उपचारांसाठी गेले आहेत तर दोघे मंत्री स्वत:च्या कामानिमित्त विदेशात आहेत. पाचवे मंत्री पांडुरंग मडकईकर मुंबईच्या इस्पितळात उपचार घेत आहेत.मडकईकर यांची प्रकृती थोडी सुधारली आहे. ब्रेन स्ट्रोकनंतर तीन महिने ते इस्पितळात आहेत. आता ते उठून बसतात व बोलतात, असे समजते. मात्र, त्यांना इस्पितळातून कधी डिस्चार्ज मिळेल याची काहीच माहिती नाही. त्यांना काही दिवस इस्पितळात रहावे लागेल, असे कळते.मुख्यमंत्री पर्रीकर उपचारांसाठी दुसऱ्यांदा अमेरिकेला गेले आहेत. ते २३ किंवा २४ रोजी गोव्यात परततील, असे समजते. मुख्यमंत्री न्यूयॉर्कमधील स्लोन केटरिंग स्मृती इस्पितळात उपचार घेत आहेत. उपचार घेण्यासाठी गोव्याचे नगरविकास मंत्री डिसोझा सोमवारी अमेरिकेला रवाना झाले आहेत. डिसोझा यांची प्रकृती खालावलेली आहे. त्यांच्यावर वर्षभर उपचार सुरू आहेत. ते गेले काही घरातूनच काम करत होते. उपचार घेतल्यानंतर डिसोझा हे कॅनडाला आपल्या नातेवाईकाकडे जातील, असे सूत्रांनी सांगितले.आरोग्यमंत्री विश्वजित राणे कामानिमित्त विदेशात आहेत. कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी काही सहकाºयांसोबत काही कामानिमित्त कॅनडा गाठले आहे. राणे सप्टेंबरला परततील. गेले दोन-तीन आठवडे मंत्रिमंडळाच्या बैठका होऊ शकलेल्या नाहीत. मुख्य सचिव धमेंद्र शर्मा आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील प्रधान सचिव कृष्णमूर्ती हे फोनवरून मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असतात. माविन गुदिन्हो, सुदिन ढवळीकर, गोविंद गावडे, विनोद पालयेकर, जयेश साळगावकर बाबू आजगावकर हे मंत्री मात्र गोव्यात आहेत.भाजपची टीम अंधारातमंत्री डिसोझा किंवा मंत्री मडकईकर यांच्या आरोग्य स्थितीविषयी भाजपाच्या कोअर टीमलाही पूर्ण कल्पना नाही. मंत्री डिसोझा यांनी तर भाजपच्या कोअर टीमला काहीच कल्पना दिलेली नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष, सरचिटणीस किंवा अन्य कुणी प्रत्यक्ष जाऊन त्यांना मुंबईच्या इस्पितळात भेटू शकत नाहीत. आरोग्यमंत्री राणे हेही आत जाऊ शकले नव्हते.
गोव्याचे चार मंत्री विदेशात, दोघे उपचारांसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 11:56 PM