पणजी: आल्तिनो येथे श्री गणेश मंदिराच्या मागील भागात असलेली चार घरे पणजी महानगरपालिकेच्या मदतीने पाडण्यात आली. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. एकूण ४ घरे पाडण्यात आली असून, दोन घरे बुधवारी पाडण्यात आली, तर उर्वरीत दोन घरे गुरुवारी पाडण्यात आली.
सुमारे २००८ सालापासून या जागेच्या विषयावरुन न्यायालयीन घटला सुरु होता. भाटकारने हा खटला दाखल केला होता, अखेर निर्णय भाटकारच्या बाजूने लागल्याने उच्च न्यायालयाने घरे पाडण्याचा आदेश जारी केला होता. येथील कुटूंबियांना घर खाली करण्यासाठी आठवड्याभराची मुदतही देण्यात आली होती. मनपातर्फे एक घर मोडण्यामागे ५०,००० रुपये वसूल करण्यात येणार असल्याचे देखील या कुटूंबियांना कळविण्यात आले होते, पण पैसे जास्त होत असल्याने या कुटूंबियांनी स्वत:च आपली घरे पाडली.
गेली ४५ वर्षे ही चार कुटूंबीय येथे राहत होती, पण आता त्यांची घरे भर पावसात पाडण्यात येत असल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. मनपाला या घरांनी कधीच घर कर भरलेला नाही, परंतु या घरांना विज व पाणी जोडणी मिळालेली होती. जर ही घरे बेकायदेशीर होती, तर या घरांना विज व पाणी जोडणी कशी मिळाली? याबाबतही चर्चा सुरु आहे. या घरातील एक युवक आताच पोलिस खात्यात भरती झाला आहे.
या बेघर झालेल्या कुटूंबियांनी आमदार बाबुश मोन्सेरात यांची भेट घेत याबाबत चर्चा केली होती, परंतु न्यायालयीन आदेश असल्याने मोन्सेरातही काहीच करु शकले नाही. तरीही बाबुश यांनी या कुटूंबियांना सर्वेापरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.