मडगाव - गोव्यातील दिडशेपेक्षा अधिक धार्मिक स्थळांची मोडतोड केल्याचा आरोप असलेल्या फ्र ांसिस्क परेरा उर्फ बॉय याला आणखी चार प्रकरणांतून मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयाने आरोप निश्चितीपुर्वीच निर्दोष मुक्त केले. आता पर्यंत अशा ९ प्रकरणात बॉय निर्दोष मुक्त झालेला आहे.मडगावच्या मुख्य न्याय दंडाधिकारी कल्पना गावस यानी संशयिताला २०१४ साली तळ्यागुंडो - पारोडा येथील क्रॉस, २०१६ मध्ये झालेल्या गुडी-पारोडा येथील ब्रह्म्माची मूर्ती तसेच २०१७ झालेल्या राय येथील क्रॉस मोडतोड प्रकरणात निर्दोष मुक्त केले. तर गुरूवारी सकाळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी नारायण आमोणकर यानी त्याला १४ जुलै २०१७ रोजी पॉवर हाऊस मडगाव येथे केलेल्या क्रॉस मोडतोड प्रकरणातून आरोप निश्चितीपुर्वीच निर्दोष मुक्त केले़ यापूर्वी हाच संशयित लोटली येथील दोन क्रॉस, पारोडा येथील एक क्रॉस, कालकोंडा येथील कृष्ण मंदिर व तळवडे कुंकळ्ळी येथील ७ मंदीरांच्या तोडफोड प्रकरणातून निर्दोश मुक्त झाला आहे़संशयितावर आरोप निश्चित करण्यासाठी एकही पुरावा पुढे आलेला नाही असे नमुद करीत न्यायमुर्ती गवस यानी पोलिसांनी ही प्रकरणे अधिक सक्षमतेने तपास करण्याची गरज होती़ आणि सबळ पुरावे न्यायालयासमोर आणण्याची गरज होती असे खुल्या न्यायालयात आदेश वाचून दाखवताना म्हटले. मूळ प्रकरणात जो गुन्हा नोंद केला होता तो अज्ञात इसमा विरोधात नोंद केला होता हेही यावेळी न्या़ गवस यानी नोंद केले. या चारही प्रकरणात संशयिताच्या वतीने अॅड. अंजू आमोणकर, अॅड. मंजिला देसाई व अॅड़. एरिक कुतिन्हो यानी बाजू मांडली.मे ते जुलै या तीन महिन्यात गोव्यात ओळीने रस्त्याबाजूच्या धार्मिक स्थळांची मोडतोड चालू होती़ त्यामुळे सामाजिक वातावरणही काहीशे प्रक्षुब्ध झाले होते. अशा परिस्थितीत गोव्यात रात्रीच्यावेळी पोलिस गस्तही कडक केली होती. पोलिसांच्या दाव्या प्रमाणे १५ जुलैच्या रात्री फ्र ांसिस्को अशाच एका कामगिरीवर गेलेला असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला अटक केली होती. पोलिसांच्या दाव्या प्रमाणे त्यानंतर झालेल्या तपासात संशयिताने अशा प्रकारची आपण दीडशेच्या आसपास कृत्ये केल्याची जबानी दिली होती. बंद मूर्तीत प्रेतात्मे वास करून राहतात त्यामुळे त्याना मुक्त केले पाहिजे या धारणेतून संशयित मागची तेरा वर्षे अशी कृत्ये करायचा असा पोलिसांचा दावा होता.सांगेतील मोडतोड प्रकरणाचीही फाईल बंद होणार२००४ साली याच संशयिताने सांगे येथील वालकिणी व वाळशे येथील रस्त्याच्या बाजूला असलेली एका घुमटीची तसेच सिध्दाच्या मूर्तीची मोडतोड केल्याचा आरोप होता. मात्र तेरा वर्षापुर्वी घडलेल्या या प्रकरणात पोलिसांकडे कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने या प्रकरणातलीही फाईल पोलिस बंद करणार अशी माहिती पोलिस सुत्रांकडून मिळाली आहे़ सध्या याच संशयितावर केपे न्यायालयात दोन वेगवेगळ्या क्रॉस तोडफोड प्रकरणाची आरोपपत्रे दाखल झाली असून लवकरच ही प्रकरणेही सुनावणीस येणार आहेत.
धार्मिक स्थळांच्या आणखी चार मोडतोड प्रकरणातून बॉय निर्दोष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 6:06 PM