वासुदेव पागी ल्ल पणजी सर्व तपास यंत्रणांना एकाच वेळी सूर गवसला असून गुन्हा अन्वेषण विभाग (क्राईम ब्रँच), विशेष तपास पथक (एसआयटी), भ्रष्टाचारविरोधी पथक (एसीबी) आणि केंद्राच्या अधिपत्याखालील गोव्यातील अंमलबजावणी विभागाकडून (ईडी) गुन्ह्यांच्या तपासाचा धडाका सुरू केला आहे. जैका प्रकल्पात लुईस बर्जर कंपनीकडून दिलेल्या कथित लाच प्रकरणाच्या तपासात गुन्हा अन्वेषण विभागाने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. २१ जुलै रोजी या प्रकरणात गुन्हा नोंदविला होता. त्यानंतर तपासाचा धडाका लावताना या विभागाची सर्व शक्ती या एकमेव प्रकरणाच्या तपासकामासाठी लावली जात आहे. तपास अधिकारी दत्तगुरू सावंत व त्यांच्या पथकाने तर या प्रकरणात झोकून दिले आहे. या प्रकरणात माजी मंत्री चर्चिल आलेमाव आणि जैकाचे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर तुरुंगात आहेत. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना मिळालेला अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी गुन्हा अन्वेषण विभाग उच्च न्यायालयात लढाई लढत आहे. दुसऱ्या बाजूने, खाण घोटाळ्याचा तपास करणारे विशेष तपास पथक सक्रिय झाले आहे. समन्स बजावण्याचे काम सुरू केले आहे. कांतिलाल खाणीचे संचालक समीर साळगावकर आणि अर्जुन साळगावकर यांनी समन्स बजावल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. या घोटाळ्यात अडकलेले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते प्रफुल्ल हेदे यांनी समन्स बजावण्यापूर्वीच अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या तिघांच्याही कोठडीची मागणी विशेष तपास पथकाने केली आहे. त्यामुळे आगामी दिवसांत बड्या नेत्यांची धरपकड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लुईस बर्जर प्रकरणातील संशयित अंमलबजावणी विभागाला म्हणजे ईडीलाही हवे आहेत. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या निवासस्थानी ईडीने छापेही टाकले. एकूणच या घडामोडी पाहता सर्व तपास यंत्रणांना एकाच वेळी सूर गवसला आहे.
चार तपास यंत्रणांचा एकाच वेळी धडाका
By admin | Published: September 07, 2015 3:19 AM