पणजी : राज्यातील सध्याचा कोविड चाचण्यांचा वेग जर लक्षात घेतला तर, नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात गोव्यात एकूण ४ लाख कोविड चाचण्या पूर्ण झालेल्या असतील हे स्पष्ट होत आहे. सध्या ३ लाख ५३ हजारहून जास्त चाचण्या झाल्या आहेत. सुमारे ४६ हजार २०० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
गेल्या आठ महिन्यांत राज्यात एकूण ४८ हजार ३०० हून जास्त लोकांना कोविडची बाधा झाली. काही पर्यटक व परराज्यांतील काही लोकांचीही चाचणी गोव्यातच झाली. त्यामुळे बाधितांचा आकडाही मोठा दिसतो. गेल्या दोन महिन्यांत राज्यातील सक्रिय कोविड रुग्णांचे प्रमाण कमी होत गेले. १९ ऑक्टोबर रोजी राज्यात सक्रिय कोविड रुग्णांची संख्या एकूण ३ हजार २८३ होती. आता ही संख्या १ हजार ४०० पर्यंत खाली आली आहे. पूर्वी दिवसाला रोज सरासरी सात रुग्णांचे जीव जात होते. आता हे प्रमाण तीनपर्यंत खाली आले आहे. नोव्हेंबर महिन्यात बळींची संख्या घटली.
मध्यंतरी राज्यात कोविड चाचण्यांची संख्या कमी झाली होती. बाराशे किंवा दीड हजार चाचण्या होत होत्या. आता रोज सुमारे दोन हजार चाचण्या होत आहेत. चार दिवसांपूर्वी तर सलग दोन दिवस प्रत्येकी अडिच हजार कोविड चाचण्या झाल्या. चाचण्यांचे प्रमाण वाढले तरी, नव्या रुग्णांची संख्या जास्त वाढलेली नाही. सध्या ११७ ते १५० नवे कोविड रुग्ण आढळत आहेत. पुढील तिस दिवसांत सुमारे पन्नास हजार कोविड चाचण्या पूर्ण होतील. म्हणजेच राज्यात आतापर्यंतच्या एकूण चाचण्यांचे प्रमाण जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात चार लाख होईल. दि. ३ जानेवारीपर्यंत चार लाख चाचण्या पूर्ण झालेल्या असतील. सोळा लाख लोकसंख्येच्या गोव्यात चार लाख चाचण्या हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा निश्चितच जास्त असेल.