पणजी : आमदारांच्या शपथविधीचा सोहळा पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पात मंगळवारी वेगळ्य़ाच वातावरणात पार पडला. मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी प्रारंभीच मराठी भाषेत आमदारकीची शपथ घेतली आणि सर्वात शेवटी म्हणजे चौथ्या क्रमांकावर सुभाष शिरोडकर यांनी कोंकणीतून शपथ घेत सोहळ्याची सांगता केली.म्हापशाचे तरुण आमदार जोशुआ डिसोझा यांनी अपेक्षेप्रमाणो इंग्रजीतून शपथ घेतली. पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनीही इंग्रजीतच शपथ घेतली. शपथ घेण्यासाठी सर्वप्रथम आमदार सोपटे यांचे नाव पुकारले गेले. सभापती मायकल लोबो यांनी सोपटे यांना पद व अधिकाराची शपथ दिली. भाजपच्या तिकीटावर सोपटे प्रथमच मांद्रेचे नेतृत्व करत आहेत. पूर्वी त्यांनी भाजपतर्फे पेडणो मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. मग त्यांनी काँग्रेसतर्फे मांद्रेचे नेतृत्व केले. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व त्यांच्या समर्थकांचा विरोध असून देखील सोपटे यांनी मोठी आघाडी प्राप्त करत विजय प्राप्त केला. याविषयी भाजपमध्येही आनंदाची भावना आहे. सोपटे यांनी शपथ घेतल्यानंतर जोशुआ यांचे नाव पुकारले गेले. मग मोन्सेरात यांचे नाव घेतले गेले. सर्वात शेवटी शिरोडकर यांनी शपथ घेतली. एरव्ही अनेकदा शिरोडकर यांनी राजभवनवर मंत्रीपदाची शपथ घेताना ती इंग्रजीतून घेतलेली आहे. यावेळी मात्र त्यांनी मातृभाषा कोंकणीतून शपथ घेत कार्यक्रमाचा समारोप केला.यावेळी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर हेही उपस्थित राहिले. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि मंत्री रोहन खंवटे, मिलिंद नाईक हेही उपस्थित राहिले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. शपथ घेणा:यांमध्ये एकमेव काँग्रेस आमदार होते. पंचवीस वर्षात प्रथमच काँग्रेसने पणजीची जागा जिंकली. बाबूश मोन्सेरात यांनी शपथविधी सोहळ्य़ानंतर लगेच मुख्यमंत्री सावंत यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.
मराठीतून आरंभ, कोंकणीतून शेवट; आमदार शपथबद्ध, विरोधकही उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 8:05 PM