मडगाव - मागच्या आठवड्यात गोव्याच्या किनारपट्टीवर 18 मृत कासव मिळाल्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले असतानाच मागच्या दोन दिवसात दक्षिण गोव्यातील किनारपट्टी भागात आणखी चार मृत ऑलिव्ह रिडले कासव सापडले. यापैकी दोन वार्का किनारपट्टीवर तर दोन वास्को येथील बोगमाळो किनाऱ्यावर सापडले.
अवघ्या 10 दिवसांत अशाप्रकारे 22 कासवांचा मृत्यू झाल्याचे दिसून आल्यानंतर मृत्यूचे हे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे अशी प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. स्थानिक विभागीय वनअधिकारी सिद्धेश गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या चार कासवांपैकी दोन मृत कासव कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्यांचा आधी मृत्यू झाला असून नंतर किनाऱ्याला लागले असावेत अशी माहिती दिली. शुक्रवारी बोगमाळो ते वार्का या किनारपट्टी भागात सहा मृत कासव सापडले होते. ही आकडेवारी चिंताजनक असून या कासवांच्या संरक्षणासंदर्भात आता अधिक सतर्कता दाखवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. किनारपट्टीवरील मासेमारी आणि वाढलेले जलक्रीडाप्रकार कासवाच्या अस्तित्वावर घाला घालत असल्याचे आतापर्यंत उघडकीस आले आहे.
मोरजीतील जलक्रिडांना बंदी
पेडणे तालुक्यातील मोरजी समुद्र किनारा हा कासव संवर्धन क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या समुद्र किनाऱ्यावर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कासव अंडी घालण्यास येत असतात. या किनाऱ्यावर होणाऱ्या जलक्रीडा प्रकारामुळे या संवर्धनावर परिणाम होतो अशी मागणी करुन गोवा फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयात जी जनहित याचिका दाखल केली होती त्याला अनुसरुन या किनाऱ्यावरील जलक्रीडा प्रकारांना सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती न्यायालयात सादर केल्याने ही याचिका निकालात काढली. गोवा सरकारने जलक्रीडांना दिलेली परवानगी रद्द न करता त्यांना मोरजी येथून दुसऱ्या ठिकाणी जागा देण्यासंदर्भात आदेशात सुधारणा करण्यात आली.
पाच दिवसांतच गोव्याच्या किनारपट्टीवर 18 कासवांना जलसमाधी
कांदोळी ते काणकोण या समुद्र किनाऱ्याच्या पट्ट्यात मागच्या पाच दिवसांत तब्बल 18 मृत कासव सापडल्याने गोव्यातील पर्यावरण प्रेमीमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मागच्या दोन दिवसांत दक्षिण गोव्यातील मुरगाव ते सासष्टी या किनारपट्टी भागात सहा मृत कासव सापडल्याने गोव्यातील कासवांचे स्थान धोक्यात आले की काय ही चिंता पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे. दक्षिण गोव्यातील सासष्टी भागात झालोर (करमणो) ते फातड्रे (वार्का) या किनारपट्टी भागात केवळ 150 मीटरच्या अंतरात ऑलिव्ह रिडले जातीची तीन कासवांचा मृत्यू झाला. त्याशिवाय बेताळभाटी आणि माजोर्डा येथेही मृत कासव सापडले. मुरगावच्या जपनीस गार्डन या नावाने परिचित असलेल्या किनारपट्टीवरही एक मृत कासव सापडले. या घटनेची वनखात्याने गंभीर दखल घेतली असून या कासवांचा नेमका कशामुळे मृत्यू झाला याची चौकशी चालू असल्याचे विभागीय वनअधिकारी सिद्धेश गावडे यांनी सांगितले.