पणजी : येत्या १५ पासून सुरू होणार असलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी पक्षांतर बंदी कायदा, विधवा भेदभाव, जनमत कौल दिवस आणि अनुसूचित जातींसाठी राजकीय आरक्षणाबाबत चार खाजगी ठराव सादर केले आहेत. सभापती रमेश तवडकर हे सर्व ठराव कामकाजात दाखल करून घेऊन चर्चेला आणतील, अशी अपेक्षा युरी यांनी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले की, मी पुन्हा एकदा गोवा आणि गोमंतकीयांच्या हिताचे मुद्दे उपस्थित केले आहेत. सभापती ठराव दाखल करून घेऊन त्यावर विस्तृत चर्चा करू देतील, अशी आशा मी बाळगतो.'
विधवा भेदभावाची अन्यायकारक प्रथा थांबविण्यास कायदा आणण्यासाठी सरकारने आजपर्यंत काहीही केले नाही याचे मला खूप वाईट वाटत आहे, असे युरी म्हणाले.पक्षांतर बंदी कायदा मजबूत करण्यासाठी भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याची वेळ आली आहे. अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण देण्याची गरज आहे. गोवा विधानसभेच्या सर्व चाळीसही सदस्यांनी या दोन्ही ठरावांना पाठिंबा द्यावा आणि एकत्रितपणे आवश्यक पावले उचलण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे, असे युरी यांनी सांगितले.
ते म्हणाले की, जनमत कौलाने गोव्याची ओळख कायम ठेवली आहे. परंतु हा दिवस अजून राज्य पातळीवर साजरा केला जात नाही. ऐतिहासिक महत्त्वाच्या या दिवसाबाबत प्रत्येक आमदाराचे मत जाणून घेण्यास माझा ठराव नक्कीच मदत करेल.'
अधिवेशनात काळात शुक्रवारी खाजगी कामकाजाचा दिवस असतो व त्या दिवशी आमदारांचे खाजगी ठराव चर्चेला घेतले जातात.