वास्को: आज (दि.२५) पहाटे वास्कोत चार दुकानांना लागलेल्या आगीत आतील असलेले सर्व सामान जळून खाक झाल्याने ह्या दुकान मालकांची सुमारे ९ लाख रुपयांची नुकसानी झाली. पहाटे ५.३०च्या सुमारास आग लागल्याची माहिती वास्को अग्निशामक दलाला मिळताच त्यांच्या दोन तसेच वेर्णा व एमपीटीच्या एक बंबाने घटनास्थळावर धाव घेऊन दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.वास्को शहरात असलेल्या जुन्या ‘सिनी वास्को’ इमारतीच्या मागे असलेल्या काही दुकानांना आग लागल्याचे येथून जाणाऱ्या एका नागरिकाला दिसून येताच त्याने प्रथम वास्को पोलिसांना याची जाणीव दिली. पोलिसांनी त्वरित ही माहिती वास्को अग्निशामक दलाला दिल्यानंतर त्यांच्यासहीत वेर्णा व एमपीटी अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळावर धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याच्या कामाला सुरुवात केली. आग लागलेल्या ह्या दुकानांची शटर बंद असल्याने दलाच्या जवानांना ती उघडून आग विझवण्याच्या कामाला सुरुवात करण्यासाठी थोडाफार त्रास सोसावा लागला. दीड तासाच्या परिश्रमानंतर सकाळी ७ च्या सुमारास ह्या चार दुकानात लागलेली आग विझवण्यास अग्निशामक दलाले शेवटी यश आले.ह्या आगीच्या घटनेत त्या चार दुकानांच्या आत असलेले सर्व सामान (विकण्यासाठी ठेवलेली सामग्री, फर्निचर इत्यादी) जळून खाक झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या अधिका-यांनी दिली. जळून खाक झालेली दुकाने श्रीकांत बोरकर, अंबिका नाईक, अमलदार सिंग व शोभा चव्हाण यांच्या मालकीची असून यात पादत्रणे, ज्युस सेंटर, पान - मसाला व केस कापण्याच्या दुकानाचा समावेश असल्याची माहिती अग्निशामक दलाच्या अधिका-यांनी दिली. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याची माहिती अग्निशामक अधिका-याने देऊन याचे कारण ‘शॉर्ट सर्किट’ की आणखीन काही आहे याबाबत तपास चालू असल्याचे त्यांनी सांगितले. ह्या चार दुकानांना टेकून आणखीन १५ ती २० दुकाने असून ह्या घटनेची माहीती वेळेवरच नागरिकाने दिल्याने येथे होणार असलेली पुढची नुकसानी टळली. सदर प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.
वास्कोतील चार दुकाने आगीत भस्म
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 3:08 PM