पणजी : लाडली लक्ष्मी योजनेचा लाभ मिळावा म्हणून जे नवे चार हजार अर्ज सादर झाले होते, ते सरकारच्या महिला व बाल कल्याण खात्याने मंजूर केले आहेत. सरकार त्यासाठी आता निधी उपलब्ध करणार आहे. लाडली लक्ष्मी योजनेच्या लाभासाठी युवतींकडून मोठय़ा संख्येने अर्ज केले जातात. या योजनेखाली आयुष्यात एकदाच युवतींना एक लाख रुपयांचे अर्थसाह्य दिले जाते.बहुतांश युवतींना विवाहाच्यावेळी हे एक लाख रुपये मदतरुप ठरतात. गेल्या डिसेंबरमध्ये एकूण दीड हजार अर्ज महिला व बाल कल्याण खात्याने मंजुर केले. त्यांना अर्थसाह्यही मिळण्यास आरंभ झाला आहे. काहीजणांच्या बँक खात्यात अर्थसाह्य जमा झाले आहे. आता जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात मिळून आणखी चार हजार युवतींचे अर्ज लाडली लक्ष्मी योजनेंतर्गत मंजूर करण्यात आले आहेत. सरकारने या चार हजार लाभार्थीनाही निधी लवकर उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे.दरम्यान, महिला व बाल कल्याण खात्याकडून गृह आधार योजनाही राबविली जाते. या योजनेचे खरे लाभार्थी तेवढेच लाभार्थीच्या यादीत शिल्लक राहावेत म्हणून सरकारने सर्वेक्षण सुरू केले आहे. जीईएलकडून सव्रेक्षण केले जात आहे. लाभार्थीच्या घरोघर जाऊन हे सर्वेक्षण केले जाते. खात्याचे संचालक दीपक देसाई यांनी मंगळवारी लोकमतला सांगितले, की ज्या महिलांच्या कुटुंबांचे उत्पन्न आता वाढले आहे व ज्यांच्याकडून दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचाही लाभ घेतला जात आहे, त्यांना गृह आधार योजनेचा लाभ बंद केला जाईल. यामुळे अशा महिलांनी स्वत:हून गृह आधार योजनेचा लाभ बंद करावा म्हणून खात्याला लिहावे. त्यांनी स्वत:हूनच पुढे यावे.कारण दोन योजनांचा लाभ घेता येत नाही. वार्षिक तीन लाख रुपयांपर्यंत ज्यांचे उत्पन्न असते त्यांनाच गृह आधार योजनेचा लाभ मिळतो. आता अनेक कुटुंबांचे उत्पन्न वाढलेले असेल. अशा महिलांनी स्वत:हून गृह आधार योजनेच्या लाभाचा त्याग केल्यास ते खात्यासाठीही चांगले होईल. अन्यथा सर्वेक्षणावेळी खरे लाभार्थी कळून येईलच. जर महिलांनी स्वत:हून लाभ सोडला नाही तर, त्यांच्याकडून यापूर्वीचीही वसुली केली जाणार आहे.
गोव्यात लाडली लक्ष्मीचे चार हजार अर्ज मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 11:20 PM